Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
पिंपरी-चिंचवड

श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा १७ पासून

श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा १७ पासून

सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत, तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे ४६३ वे वर्ष आहे.

याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी चिंचवड देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. देवराज डहाळे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.

महोत्सवाचे उद्घाटन व सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते 17 डिसेंबरला सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. याप्रसंगी महापालिका आयुक्त शेखर सिंह, धर्मदाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, उमा खापरे, अमित गोरखे, बापूसाहेब पठारे, आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री मार्तंड मल्हारी संस्थान जेजुरीचे मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. देवराज डहाळे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवानिमित्त दि. १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत रोज सकाळी ६ वाजता नितीन दैठणकर यांचे महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर येथे व श्री तुकाराम दैठणकर यांचे श्रीमंगलमूर्ती वाडा येथे सनई-चौघडा वादन होईल. सकाळी साडेआठ वाजता श्री मोरया गोसावी महाराज चरित्र पठण, सकाळी ९ ते १२ या वेळेत वेदमूर्ती रबडे गुरुजी यांचा लक्ष्मी-नारायण याग होईल. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत रक्तदान शिबिर, नेत्र व दंत चिकित्सा आणि आरोग्य शिबिर होईल.

पं. संजीव अभ्यंकर यांचे गायन
१७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन होईल. सायंकाळी पावणे आठ वाजता अपर्णाताई कुलकर्णी यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकर” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी साडे आठ वाजता पं. संजीव अभ्यंकर यांचा “स्वरसंजीवन” हा गायनाचा कार्यक्रम होईल.

अभंगवाणी
१८ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा सहा वाजता श्रींची महापूजा संपन्न होईल, सकाळी सात वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठण सकाळी नऊ वाजता दरम्यान सामूहिक अभिषेक, ९ ते ४ वाजता नेत्र व दंत चिकित्सा शिबिर होईल. दुपारी १२ ते ४ या वेळेत स्थानिक मंडळाचा भजन सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी चार वाजता शरदबुवा घाग यांचे कीर्तन होईल. सायंकाळी सहा वाजता महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांनी रचलेल्या पदांवर आधारित “माझ्या मोरयाचा धर्म जागो” हा कार्यक्रम होणार आहे, सायंकाळी साडेआठ वाजता पं. जयतीर्थ मेवूंडी व सहकलाकार यांचा “भक्ती संगीत व अभंगवाणीचा” कार्यक्रम होणार आहे.

व्याख्यान – टिळक पर्व
१९ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता श्रींची महाआरती होणार आहे, सकाळी नऊ वाजता श्री सुक्त पठण होईल. नऊ ते चार दरम्यान आरोग्य व दंत चिकित्सा शिबिर होईल. दुपारी बारा ते चार या वेळेत स्थानिक मंडळाचा भजन सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी चार वाजता शरदबुवा घाग यांचे कीर्तन होईल. सायंकाळी सहा वाजता श्री अविनाश धर्माधिकारी यांचे ‘टिळक पर्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री साडेआठ वाजता बेला शेंडे व सहकलाकार सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

डॉ़. माशेलकर यांना जीवनगौरव पुरस्कार
२० डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता सोहम् योग साधना मंडळाचे शिबिर होईल. सकाळी नऊ ते पाच दरम्यान आरोग्य व रक्तदान शिबिर होईल. सायंकाळी सहा ते आठ दरम्यान श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्राविड आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. तर, रात्री साडेआठ वाजता पं. शाहीद परवेझ – सतार, पं. राजस उपाध्ये –व्हायोलीन, पं. विजय घाटे – तबला यांचा कार्यक्रम होईल.

२१ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधीची महापूजा मंदार महाराज देव यांच्या हस्ते होईल. सकाळी सहा वाजता सनई चौघडा वादन, सकाळी सात वाजता श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी होईल. यानंतर श्रींची नगरप्रदक्षिणा संपन्न होईल. सकाळी साडेनऊ वाजता हभप पुरुषोत्तम दादा पाटील यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. त्यानंतर श्री मोरया गोसावी महाराज चरित्र पठण होईल. दुपारी १२ वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी सहा वाजता श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरात मानवंदना होईल. सायं. सात वाजता आतिषबाजी होईल. रात्री १० वाजता श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी समोर धुपारती व त्यानंतर श्री मंगलमूर्ती वाडा येथे धुपारती होईल. त्यानंतर महोत्सवाची सांगता होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना मोरया भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळांने केले आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"