महापौरपदाचे इच्छुक जेष्ठ नगरसेवक मोर्चे बांधणीसाठी लागले कामाला!

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी जाहीर झाल्याने इच्छुक असलेले जेष्ठ नगरसेवक मोर्चे बांधणीसाठी कामाला लागले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौर पद चिंचवड विधानसभा मतदारसंघात मिळणार की भोसरी विधानसभा मतदारसंघात याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

हे पद आपल्या मतदारसंघात मिळावे यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे प्रयत्नशील राहणार आहेत.पिंपरी चिंचवड महापालिकेआपले वर्चस्व रहावे यासाठी भाजपचे दोन्ही आमदार सत्ता संघर्ष करणार अशी भाजपमध्ये चर्चा आहे. महापौरपद एका मतदारसंघात तर स्थायी समितीचे अध्यक्षपद दुसऱ्या मतदारसंघात असा समझोता होण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता मिळविल्यानंतर नितीन काळजे,राहुल जाधव, माई ढोरे यांनी महापौरपद भूषवले आहे. 2017 ते 2022 या कालावधीत कोणतेहीपद न मिळालेले नगरसेवक महापौर पदासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. यामध्ये शहर भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, राहुल कलाटे, रवी लांडगे, सुरेश भोईर, नवनाथ जगताप, नितीन लांडगे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

