फक्त मुद्द्याचं!

19th May 2024
Live news अध्यात्म सांस्कृतिक

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान २८ जूनला

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान २८ जूनला
  • PublishedMay 8, 2024

प्रतिनिधी, पिंपरी : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या श्री क्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान २८ जूनला पालखी प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदा केवळ पुण्यामध्येच पालखीचा मुक्काम दोन दिवसांसाठी असेल.

Tukaram Maharaj
Tukaram Maharaj

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी प्रत्येक वारकरी आस लावून बसलेला असतो. माऊलींच्या भेटीसाठी आतुरलेला असतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने ३३९ व्या पालखी सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली आहे. त्यानुसार ज्येष्ठ वद्य सप्तमीच्या दिवशी म्हणजेच २८ जून रोजी श्री क्षेत्र देहू येथून तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आकुर्डी येथे २९ जून, पुणे येथे ३० जून आणि एक जुलै पालखीचा मुक्काम असेल. पुणे शहराच्या बाहेर लोणी काळभोर (दोन जुलै), यवत (तीन जुलै), वरवंड (चार जुलै), उंडवडी गवळ्याची (पाच जुलै), बारामती (सहा जुलै), सणसर (सात जुलै), आंथुर्णे (आठ जुलै), निमगाव केतकी (नऊ जुलै), इंदापूर (१० जुलै), सराटी (११ जुलै), अकलुज (१२ जुलै), बोरगाव (१३ जुलै), पिराची कुरोली (१४ जुलै), वाखरी (१५ जुलै) या ठिकाणी पालखी मुक्कामासाठी असणार आहे.

हा पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरला १६ जुलै रोजी प्रवेश करणार आहे. त्यानंतर २१ जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिराच्या नवीन इमारतीमध्ये राहणार आहे. यंदा बेलवडी, इंदापूर आणि अकलूज येथे पालखी मार्गावर गोल रिंगण होणार असून, उभे रिंगण माळीनगर, वाखरी येथील बाजीराव विहिर आणि पादुका आरती या ठिकाणी होणार आहे.

आषाढी वारीचा सोहळा संपन्न झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास २१ जुलैला सुरू होईल. त्यानंतर वाखरी, महाळुंगे, वडापुरी, लासुर्णे, बऱ्हाणपूर, हिंगणीगाडा, वरवंड, उरुळी कांचन, पुणे नवी पेठ, पिंपरीगाव या ठिकाणी मुक्काम करून पालखी ३१ जुलैला श्री क्षेत्र देहू येथे परतणार आहे. काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमांत बदल करण्याचे अधिकार पालखी सोहळा प्रमुखाला असणार आहेत. अडथळा येईल त्या ठिकाणी पालखी जाणार नाही, असे संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Written By
Admin@BLOG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"