पोलीस असल्याची बतावणी; दागिने हातचलाखीने लांबविले!

पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्येष्ठ नागरिकाला गाठून बनावट ओळखपत्र दाखवून दागिन्यांच्या तपासणीचा बहाना करत 1 लाख 80 हजार रुपयांचे दागिने हातचलाखीने लांबविले. ही घटना मंगळवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी बोऱ्हाडेवाडी येथे घडली.

बबन भाऊसाहेब बोऱ्हाडे (वय 77, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी वरील दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोऱ्हाडे यांना रस्त्यात अडवून आरोपींनी तुम्ही पाटीलला ओळखता का? आम्ही पोलीस आहोत असे सांगितले. लांबूनच बनावट ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन केला. एका साथीदाराला पुढे करून दागिने तपासण्याचा बहाणा करण्यात आला. बोऱ्हाडे यांच्याकडील वीस ग्रॅम सोन्याची चैन आणि दहा ग्रॅमची अंगठी रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर दागिन्यांचा रुमाल घेऊन दोघांनी दुचाकीवरून पोबारा केला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
सुपरवायझरने थकीत पगार मागितल्याने कोयत्याने वार!
पिंपरी : थकीत पगाराची मागणी केल्याच्या रागातून सुपरवायझरच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सोमवार 12 ऑक्टोबर रोजी रात्री रावेत मध्ये घडली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर विश्वास पाटील (वय 38, रा. पिंपळे निलख) यांनी फिर्यादी दिली आहे. गजानन पवार आणि परशुराम वारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुपरवायझर पाटील यांनी दोन ते तीन वेळा थकित पगाराची मागणी केली होती. ते कामावर जात नव्हते. याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना दमदाटी केली. तू कामावर आला नाहीस तर जगात राहणार नाहीस अशी धमकी देत गजानन पवार यांनी त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. यात ते गंभीर जखमी झाले परशुराम वारे यांनी फिर्यादीचे सहकारी गर्दे यांना देखील मारहाण करून जखमी केले.

