सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून दागिने लांबवले!

पिंपरी : सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे दोन लाख 55 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हात चलाखीने लांबविले. ही घटना मंगळवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात घडली.
नारायण ओंकार कासार (वय 75, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी कासार यांना रस्त्यात गाठले आपण सीआयडीचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांना ओळखपत्र दाखवले. सुरक्षेच्या कारणास्तव अंगावरील दागिने काढून कपड्यात ठेवण्यास सांगितले. त्यानुसार कासार यांनी गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची रुद्राक्ष माळ आणि सहा ग्रॅमची अंगठी काढली. त्यानंतर नजर चुकवून आरोपींनी दागिने लांबविले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
जेवणाच्या वादातून वडिलांच्या डोक्यात मारला सिमेंटचा गट्टू!
पिंपरी : घरगुती आणि जेवणाच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना सोमवार 12 ऑक्टोबर रोजी राहाटणी येथे घडली. दत्तात्रय शंकर जाधव (वय 47, रा. रहाटणी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा अजिनाथ दत्तात्रेय जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील जेवणाच्या कारणावरून पिता- पुत्रामध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन वडील दत्तात्रेय जाधव यांना गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

