निवडणुकीच्या कामासाठी पीएमपीएमएलच्या ९६८ बस

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ११ मतदारसंघांमध्ये पीएमपीएमएलची बससेवा वापरली जाणार आहे.
या ११ मतदार संघांमध्ये ९६८ बस आज सकाळपासून (१९ नोव्हेंबर) दुपारपर्यंत आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी वापरात असतील. कर्मचाऱ्यांची ने-आण, मतदान यंत्रांची ने-आण करण्यासाठी या बसचा वापर केला जातो. निवडणूक कामासाठी वापरात येणाऱ्या बसमुळे पीएमपीएमएलला अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. या दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दळणवळणासाठी थोड्या बस उपलब्ध असतील. या कारणामुळे कदाचित प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी ही बाब ध्यानात घ्यावी, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.