फक्त मुद्द्याचं!

25th March 2026
पिंपरी-चिंचवड

‘विकसित भारत’च्या दिशेने पिंपरी-चिंचवडची नवी विकासयात्रा : महापौर रवि लांडगे

‘विकसित भारत’च्या दिशेने पिंपरी-चिंचवडची नवी विकासयात्रा : महापौर रवि लांडगे

पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण, समतोल आणि वेगवान विकासास प्राधान्यक्रम
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेली विकसित भारताची संकल्पना हे केवळ धोरण नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारी दिशा आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहराला विकसित, स्मार्ट आणि आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प मी करीत आहे. पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासीदृष्ट्या देशातील अग्रगण्य शहर आहे. या शहराचा नियोजित, समतोल आणि नागरिककेंद्री विकास हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असेल. शहरातील पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, वाहतूक, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल. भारतीय जनता पार्टीचा उद्देश हा अंत्योदय आहे. समाजातील शेवटच्य घटकांपर्यंत विकास पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे पिंपरी-चिंचवडचे नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

viara vcc
viara vcc

महापौर रवि लांडगे यांनी निवडीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज मला महापौरपदाची जबाबदारी देण्यात आली. ही निवड लोकशाही मूल्यांचा आणि शहराच्या एकत्रित वाटचालीचा सन्मान आहे, असे मी मानतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाले आहेत. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या स्वयंसेवकाला महापौर होण्याची संधी पक्षाने दिल्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, देशाचे गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहरातील आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमाताई खापरे, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी पिंपरी-चिंचवड शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मला महापौरपद देऊन भारतीय जनता पार्टीने माझे चुलते दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्या संघर्षाचा पक्षाने सन्मान केला असे मी मानतो.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत डिजिटल प्रशासन, ई-गव्हर्नन्स, पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्मार्ट सिटी उपक्रम, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि हरित क्षेत्र वाढविणे यावर विशेष लक्ष दिले जाईल. नदी स्वच्छता, पावसाळी पाणी व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. औद्योगिक क्षेत्रातील अडचणी, कामगार प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसन तसेच शहरातील दुर्लक्षित भागांचा विकास या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्यावर माझा भर असेल.

शहरातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सामावून घेणे हेच माझे ध्येय आहे. त्यासाठी शासन, महापालिका प्रशासन, सर्वपक्षीय नगरसेवक आणि नागरिक यांच्या सहकार्याने पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न आहे.

शहराच्या हितासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करणार आहे. महापौर म्हणून मी कोणताही पक्षभेद न ठेवता संपूर्ण शहराचा महापौर म्हणून काम करेन. सर्व प्रभागांना समान न्याय देणे, दुर्लक्षित घटकांपर्यंत सुविधा पोहोचवणे आणि नागरिकांच्या प्रश्नांना संवेदनशीलतेने हाताळणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक या मूलभूत बाबींवर विशेष लक्ष दिले जाईल. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक केली जाईल.

विकासकामांमध्ये आणि शहराच्या विकसित वाटचालीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी संवादाचे मार्ग खुले ठेवले जातील. नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे वेळेत निवारण आणि विकासकामांचा दर्जा यावर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाईल. ही जबाबदारी मी सेवाभावाने स्वीकारली आहे. सर्वांच्या सहकार्याने शहर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि मानवी मूल्यांवर आधारित विकसित करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. ही जबाबदारी केवळ पदाची नाही, तर शहराच्या भविष्यासाठीची आहे. सर्वांच्या सहकार्याने शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन, असे त्यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"