फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कॉफी विथ कमिशनर

पिंपरी-चिंचवडमध्ये कॉफी विथ कमिशनर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील चाय पे चर्चा धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कॉफी विथ कमिशनर हा अनोखा उपक्रम मंगळवारपासून सुरू केला. नवी दिशा उपक्रमातील महिला बचत गटांचा प्रशासनातील सहभाग वाढविणे हा उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या अनोख्या उपक्रमात पहिल्या दिवशी पालिकेच्या अ आणि ग क्षेत्रीय कार्यालयनिहाय सामुदायिक शौचालय देखभाल कामाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बचत गटांच्या महिला सहभागी झाल्या. त्यांनी भविष्यातील संधी, आव्हाने आणि अनुभव याबद्दल आयुक्त सिंह यांच्यासमवेत चर्चा केली.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर कार्यालयात या उपक्रमाचा प्रारंभ पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत झाला. नवी दिशा उपक्रमांतर्गत शहरातील तळागाळातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामुदायिक शौचालयांच्या देखभालीचे काम देण्यात आले आहे. त्यातील विविध स्वयं सहायता बचत गटातील महिलांना थेट आयुक्त सिंह यांच्याशी संवाद साधण्यासाठी, आव्हाने आणि अभिप्राय देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कॉफी विथ कमिशनर उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाने आम्हांला वेगळी ओळख निर्माण करून देण्यात आली. आयुक्तांच्या प्रत्यक्ष भेटीत ते आमच्या सूचनांवर विचार करतील, अशी अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे प्रशासनातील महिलांचा सहभाग वाढविण्यास नक्कीच मदत मिळेल, अशी अपेक्षा भरारी महिला बहुउद्देशीय मंडळाच्या सदस्या लता रोकडे यांनी व्यक्त केली.

सामुदायिक शौचालय चालविणे आणि त्यांची देखभाल करण्याचे काम सोपे नाही. परंतु, प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे काम शक्य होत आहे. यापुढील काळात प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे काम शक्य होणार असून, उत्साहाने काम करण्यास ऊर्जा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया ऐश्वर्या महिला बचत गटाच्या सदस्या राजश्री वेताळे यांनी व्यक्त केली.

महिन्यातून दोनदा कॉफी विथ कमिशनर
महिन्यातून दोन वेळा कॉफी विथ कमिशनर उपक्रमाचे आयोजन पालिकेतर्फे केले जाणार आहे. त्या माध्यमातून पालिकेच्या विविध क्षेत्रीय काल्यालयांतील महिला गटांना आयुक्तांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. प्रशासकीय कामकाजात नवी दिशा प्रकल्पातील महिलांचा सहभाग वाढविणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रेरणा देणे हा उपक्रमाचा उद्देश आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"