गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे आयोजन!

नाट्य, संगीत, साहित्य, लोककला, मर्दानी खेळांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देणे, स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच शहराच्या कला, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.

महोत्सवाच्या आयोजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महोत्सवाच्या स्वरूपाची व नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली.
पिंपरी-चिंचवड शहराने औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला, साहित्य, नाट्य, संगीत, क्रीडा आणि लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शहरातील या सांस्कृतिक ऊर्जेला एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे, विविध पिढ्यांना सांस्कृतिक उपक्रमांशी जोडणे आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा अधिक दृढ करणे हा महोत्सवाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
तीन दिवसीय महोत्सवात सर्व वयोगटांतील नागरिकांचा सहभाग राहील, अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. नाट्यरसिकांसाठी दर्जेदार व लोकप्रिय व्यावसायिक मराठी नाटकांचे विशेष प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायक-कलाकारांच्या सहभागातून भावगीत, नाट्यगीत, भक्तिगीत तसेच लोकप्रिय मराठी-हिंदी गीतांचा समावेश असलेली संगीत मैफल आयोजित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या पारंपरिक लावणीचे सादरीकरण, तरुणाईसाठी आधुनिक संगीत आणि फ्यूजनचा समावेश असलेला रॉक बँड परफॉर्मन्स तसेच विविध सामाजिक विषय, हास्य-विनोद आणि समकालीन आशय मांडणाऱ्या नामवंत कवींचे राज्यस्तरीय कवी संमेलन हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
महिलांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी पाककला स्पर्धा आणि फॅशन शो आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या लाठी-काठी, दांडपट्टा व अन्य मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात येणार आहेत.
बालकलाकारांच्या अभिनय व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी बालनाट्य व बाल एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक वस्तू, हस्तकला, स्थानिक कलाकुसर आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘संस्कृती जत्रा’ व प्रदर्शनाचे आयोजनही महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
महोत्सवाचा तपशील
कालावधी : दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६
स्थळ : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, आयोजक : पिंपरी-चिंचवड महोत्सव समिती
स्पर्धा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. मनोज डाळीम्बकर — ८२३७३३२२११, श्री. राजेंद्र बंग — ९८२२३१३०६६ , मा. महापौर कार्यालय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

