अवैधरीत्या लोखंडी तलवार व कोयता जवळ बाळगल्याने एकास अटक!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना या आदेशाचा भंग करून एका तरुणाने लोखंडी तलवार व धारदार लोखंडी कोयता ही हत्यारे जवळ बाळगली. ही घटना सोमवार सात सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिर विद्यानगर, पिंपरी येथील मोकळ्या जागेत घडली.
या प्रकरणी दीपक भीमराव तांदळे पोलीस कॉन्स्टेबल, गुन्हे शाखा युनिट एक यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेम कृष्णा मोरे (वय 19, बिल्डिंग क्रमांक इ -तेवीस, रूम नंबर 468, डॉक्टर आंबेडकर वसाहत, समर्थ हाऊसिंग सोसायटी, ओटा स्कीम, निगडी, प्राधिकरण) यास अटक करण्यात आली असून रोहन माने (रा. विद्यानगर कमानी जवळ, चिंचवड) व रियान शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रेम मोरे याच्याकडून एक लोखंडी तलवार व एक लोखंडी कोयता असे मिळून 1600 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीमध्ये शस्त्र बाळगण्यास बंदी असताना या बंदीचे उल्लंघन केले. लोखंडी तलवार व लोखंडी कोयता आरोपीने रोहन माने व रियान शेख यांच्याकडून घेतले असल्याचे आरोपीने सांगितले. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केणे व पोलीस हवालदार सरडे हे तपास करत आहेत.

गोठ्यातून साठ हजार रुपये किंमतीची म्हैस गेली चोरीला!
पिंपरी : नव्याने विकत घेतलेली व गोठ्यात बांधलेली मुर्हा जातीची म्हैस अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना रविवार 6 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजल्यानंतर राहते घरी सुदुबंरे, ता. मावळ येथे घडली.
या प्रकरणी संजय बबन गाडे (वय 56, रा.सुदुंबरे, ता मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी रविवार 6 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोठ्याचा दरवाजा बंद करून दरवाज्यास कडी- कोंयडा लावून झोपी गेले. त्यानंतर सोमवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा गाई म्हशींच्या धारा काढण्यासाठी गेला असता गोठ्यामध्ये नवीन साठ हजार रुपये किंमतीची घेतलेली म्हैस दिसली नाही. फिर्यादी यांनी आजूबाजूस शोध घेतला परंतु म्हैस मिळून न आल्याने सदरची म्हैस कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीने चोरून नेली.

