निवडणूक लढविण्याच्या मुद्यावर नाना काटे ठाम !

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे बंडखोर उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या नाना काटे यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये पवार यांनी काटे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. मात्र, निवडणूक लढविण्याच्या मुद्यावर ठाम असल्याचे काटे यांनी सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाचे शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाराज झालेले महायुतीच्या घटक पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर पवार यांनी काटे यांची गुरुवारी भेट घेतली. त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यावर विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल. बंडखोरी थोपविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
पवार यांनी काटे यांच्या पिंपळे सौदागर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. महायुतीमधील बंडखोरी टाळावी, हा भेटीचा हेतू होता, असे सांगण्यात आले. या बैठकीला प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे, नीलेश डोके, प्रभाकर वाघेरे, संतोष बारणे, मयूर कलाटे, उषा काळे, माई काटे, सतीश दरेकर, नारायण बहिरवाडे, राजेंद्र साळुंखे, हरिभाऊ तिकोणे, माउली सूर्यवंशी, श्रीधर वाल्हेकर, राजू बनसोडे, दिलीप काळे, शेखर काटे, शिरीष साठे, श्याम जगताप, बापू कातळे, नवनाथ नढे, प्रशांत सपकाळ, सनी ओव्हाळ, संगीता कोकणे, सागर कोकणे उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त पवार बारामतीला जात असताना माझी भेट घेण्यासाठी आले होते, असे स्पष्ट करून काटे यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढविण्याच्या मुद्यावर ठाम असल्याचे सांगितले. माझी भूमिका येत्या चार तारखेनंतर समजेल, असेही त्यांनी नमूद केले.