फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विशेष उपक्रमामुळे बालवाडीतील बालकांना फायदा!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विशेष उपक्रमामुळे बालवाडीतील बालकांना फायदा!

वर्गखोल्या आकर्षक आणि सर्वसमावेशक बनल्याने मुलभूत शिक्षणात २० टक्क्यांहून अधिक प्रगती
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने विशेष मोहीम हाती घेत महापालिकेच्या सर्व २११ बालवाड्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या उपक्रमामुळे सहा हजारांहून अधिक बालकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार, आकर्षक आणि शिकण्यासाठी अनुकूल वर्गखोल्या मिळाल्या असून त्याचा बालकांना खूपच फायदा होतोय.

viara vcc
viara vcc

बालवाडीतील बालकांसाठी गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेने पूर्व बाल्यावस्था काळजी आणि शिक्षण (ECCE) या रणनीतीवर आधारित विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे बालकाची साक्षरता, अंकज्ञान आणि विविध कौशल्यांमध्ये २० ते २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या साध्या वर्गखोल्या आता खेळ आधारित शिक्षण, कथाकथन, प्रत्यक्ष अनुभव देणारे चैतन्यशील वातावरणासोबतच एकप्रकारे बाल केंद्रित ज्ञानकेंद्रांमध्ये रूपांतरित झाल्या आहेत.

शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील सकारात्मक संबंधांचा फायदा
बालवाड्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षक, पर्यवेक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आदींनी आपले योगदान दिले. संबंधितांनी अभ्यासक्रमाची पुनर्रचना करुन त्यामध्ये नियमित मासिक प्रशिक्षण, विशेष शिक्षण साहित्य आणि शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील सकारात्मक संबंधांमुळे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होण्यास मदत झाली.

महापालिकांच्या बालवाड्यांमध्ये राबविलेल्या धोरणामुळे लक्षणीय बदल झाले आहे. यामुळे आता बालवाडीतील मुले खेळाद्वारे इंग्रजी आणि विज्ञानाचे धडे गिरवत असून डॉक्टर आणि पोलीस अधिकारी मुलांशी संवाद साधत असून मुले खेळणी, ब्लॉक्स व सर्जनशील खेळांद्वारे कौशल्ये विकसित करीत आहेत. सदर उपक्रमामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सामाजिक-भावनिक शिक्षण आणि सुरक्षित स्पर्शाचे प्रशिक्षण दिल्यामुळे मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळत आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये
२११ महापालिका बालवाड्यांमध्ये यशस्वी परिवर्तन, सहा हजारांपेक्षा जास्त बालकांना लाभ, पायाभूत कौशल्यांमध्ये २०-२४ टक्के सुधारणा, खेळ-आधारित, कौशल्य-केंद्रित अभ्यासक्रमाचा स्वीकार, पालक भागीदारी आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) चे यशस्वी एकत्रीकरण, वास्तविक जगाच्या अनुभवांसह आणि भावनिक सुरक्षिततेने समृद्ध वर्ग शिक्षण, आदर्श बालवाडी’ साठी शिक्षण विभाग घेणार पुढाकार

शिक्षण विभागाने बालवाडींच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य आराखड्यानुसार विशेष हस्तपुस्तिका तयार केली असून त्याची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने दखल घेतली. याचबरोबर महापालिका चालू शैक्षणिक वर्षापासून २० बालवाडी ‘सीएसआर’ फंडातून व २० बालवाडी महापालिकेच्या पुढाकारातून आदर्श बालवाडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, पर्यवेक्षक, मुख्य समन्व्ययक यांच्याकडून कामकाजाचे परीक्षण करुन बालवाडीमधील एका शिक्षकास आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.

बालपण हा प्रत्येक व्यक्तीच्या विकासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाची एक भक्कम आनंदी सुरुवात व्हावी, हेच आमचे ध्येय आहे. आमच्या बालवाड्यांमध्ये गुंतवणूक करून, शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन, पालकांना या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेऊन आणि खेळ-आधारित शिक्षणाचा स्वीकार करून, आम्ही अधिक समावेशक आणि सुशिक्षित पिंपरी चिंचवडचा भक्कम पाया रचत आहोत. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"