आळंदी माऊली मंदिरातील दानपेटीतील रक्कम लंपास;सेवकाला अटक!

पिंपरी : आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरल्याप्रकरणी मंदिरातील सेवकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर महादेव वीर (वय 49, रा. आळंदी देवाची, ता खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
विशाल बाळ वारुळे (वय 33, रा. चोवीसावाडी, ता. हवेली, मूळ- रा. वारुळवाडी, ता. जुन्नर) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वारुळे यांनी तीन दिवसात टप्प्याटप्प्याने 15000 रुपये चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .आरोपी मंदिरात सेवक म्हणून काम करत होता. दानपेटीतील पैसे कॅश रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्याने दानपेटीतील पैसे बादलीत भरताना संधी साधून ते वेगळे काढले. त्यानंतर पोत्यात लपवून त्यावर फुलांचे हार ठेवले आणि कॅश रूममध्ये नेत असल्याचे भासवले. याप्रमाणे त्याने तीन दिवसात प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण!
पिंपरी : उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला आणि त्याच्या मित्रांना तिघांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना चिखली परिसरात घडली. याप्रकरणी तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण नानासाहेब वाघमारे (वय 38, रा. अजंठानगर, चिंचवड ) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन कानगुडे (वय 30), प्रवीण कानगुडे (वय 28) आणि जिजाबाई उगले (वय 30, सर्व रा. मोरे वस्ती ,चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे मित्र अशोक कदम व गणेश चंदनशिवे हे उसने दिलेले पैसे मागण्यासाठी आरोपीकडे गेले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. मारहाणी दरम्यान महिला आरोपीने फिर्यादीच्या मानेवर नखांनी वरखडे काढले. तर नितीन याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

