सहा ते दहा मे या कालावधीत महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन!

महापौर चषक कबड्डी स्पर्धेसाठी 1 कोटी खर्चास स्थायीची मंजुरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सहा ते दहा मे या कालावधीत महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी तब्बल 99 लाख 53 हजार 360 खर्च स्थायी समितीने आयत्यावेळी मंजूर केला आहे. या राज्यस्तरीय स्पर्धा भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहशेजारच्या गाव जत्रा मैदान येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत राज्यातील महिला व पुरुष गटाचे संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने भैरवनाथ कबड्डी संघ, भैरवनाथ कबड्डी संस्था आणि शिवतेज कबड्डी संघाच्या सहकार्याने या महापौर चषक स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. कबड्डी स्पर्धेसाठी मैदान तयार करणे, स्टेज मंडप, खेळाडूंची निवास व्यवस्था, पंचाचे मानधन, प्रवास खर्च, सांघिक व वैयक्तिक बक्षीस रक्कम, स्मृतीचिन्ह, चहापान ,अल्पोहार, भोजन व्यवस्था, शूटिंग करणे आणि अन्य असा एकूण 99 लाख 53 हजार 360 रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास आयत्यावेळी स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने विकास कामांवर त्याचा परिणाम होणार असल्याची चर्चा लोकप्रतिनिधी सभागृहात आणि सभागृहाबाहेर करतात. मात्र खर्चावर नियंत्रण आणण्याचे काम मात्र ते करत नाहीत हे दुर्दैव आहे .नुकत्याच महापालिकेने महापौर चषक राष्ट्रीयस्तर शरीर सौष्ठव स्पर्धा 28 ते 30 मार्च यादरम्यान आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी महापालिकेच्या क्रीडा विभागांकडून 23 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. भविष्यात महापालिका राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा देखील भरवू शकते अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.

