मिलिटरी डेअरी फार्मच्या 400 एकरमध्ये होणार 58वा निरंकारी संत समागम!

24 जानेवारीपासून निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगम
पिंपरी: महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक भक्तगण समागम स्थळ समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रुप देत आहेत. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे झोनसह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो सेवादल स्वयंसेवक आणि भाविक भक्तगण सातत्याने आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत. पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे 400 एकरच्या विस्तीर्ण मैदानात शुक्रवार, दि.24 जानेवारी 2025 पासून हा तीन दिवसीय संत समागम सुरू होत असून, त्याची सांगता 26 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. मुख्य सत्संग कार्यक्रम दररोज दुपारी 2 वाजता सुरू होईल ज्यामध्ये अनेक वक्ते, गीतकार, कवी सद्गुरु आणि ईश्वराप्रती आपल्या मनातील भावना व्यक्त करतील. शेवटी रात्री ८ वाजल्यापासून सर्वांना सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचा पवित्र आशीर्वाद लाभणार आहे.
मागील एक महिन्यांपासून महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यांतून निरंकारी भक्तगणांनी समागम स्थळांवर येऊन आपल्या निष्काम सेवांच्या माध्यमातून समागम स्थळाला एका सुंदर नगरीच्या रुपात परिवर्तित केले आहे. सर्व श्रद्धाळू ज्या उत्साहाने, आवडीने, भक्तिभावाने, मर्यादा व अनुशासनाचे पालन करत आपल्या सेवा निभावत आहेत ते पाहून जनसामान्य अत्यंत प्रभावित आहेत.
समागमात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तगणांसाठी व्यापक स्तरावर निवासी तंबू, लंगर, कॅन्टीन, दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग आणि रेल्वे स्थानक आणि बसस्थानकातून ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था इत्यादीची यथोचित व्यवस्था करण्यात आली आहे. समागम स्थळावर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. प्रकाशन विभागाकडून समागम स्थळावर वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले जात आहेत. संत निरंकारी मिशनचे सचित्र दर्शन घडविण्यासाठी आकर्षक निरंकारी प्रदर्शनीचेही आयोजन केले जात आहे यासह एकूण आठ कार्यशाळा असलेली भव्य बाल प्रदर्शनी देखील असेल, प्रत्येक कार्यशाळा मुलांना आकर्षक आणि शैक्षणिक अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. हे सर्व सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनानेच शक्य झाले आहे.