फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

कानबाई उत्सव खान्देशच्या परंपरेचे दर्शन घडवतो

कानबाई उत्सव खान्देशच्या परंपरेचे दर्शन घडवतो

पिंपरी, प्रतिनिधी : कानबाई उत्सव हा खान्देशातील प्रमुख उत्सव आहे. जात, पात, धर्म बाजूला ठेवून हा उत्सव साजरा केला जातो. खान्देशात पिढ्यानपिढ्यापासून हा उत्सव सुरु आहे. सासू सुनेला, आई आपल्या मुलीला या उत्सवाबद्दल सांगत परंपरा पुढे नेण्याचा सल्ला देत असून, ‘कानबाई’ उत्सवातून खान्देशच्या सांस्कृती-परंपरेचे दर्शन घडत असते. वडीलधाऱ्यांकडून मिळालेला हा वारसा पुढे नेण्याचे काम पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीत सूरू असल्याचा एक खान्देशी म्हणून अभिमान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले.

यावेळी खासदार स्मिता वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी, खासदार श्रीरंग बारणे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार उमा खापरे, कार्यक्रमाचे संयोजक माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके मान्यवर उपस्थित होते. खान्देश कानबाई माता उत्सव समिती, पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने खान्देशातील संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सण पुढील पिढयांसाठी प्रेरणा आणि वारसा अखंडीत ठेवण्यासाठी दोन दिवसीय खान्देश दैवत माय कानबाई माता उत्सवाचे आयोजन केले होते. आहेर गार्डन येथे महोत्सवाचे उदघाटन खडसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, ‘महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. राज्यातील प्रत्येक भागात त्या-त्या ठिकाणांनुसार वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आणि वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. राज्याचा महत्त्वाचा भाग असलेला खान्देश देखील आपल्या वेगळ्या परंपरा आणि उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी प्रास्ताविक केले. सुवासिनींच्या हस्ते कानबाई मातेची स्थापना करून रात्रभर अहिराणी भाषेतील लोकगीतांवर नृत्य करत कानबाईची भक्ती करण्यात आली.

तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर येथून गहु दळण (सप्ता पूजन) कार्यक्रम, तसेच फुलमाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार करत त्यावर आकर्षक रोषणाई करून माय कानबाई भव्य मिरवणुक तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी ते आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथून काढून, आहेर गार्डन वाल्हेकरवाडी येथे देवीची स्थापना करण्यात आली. प्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित खान्देशवासीयांनी कानबाईची आरती केली. तसेच, गायक अशोक वनारसे, गायिका आश्विनी भोंडवे यांच्या मातेचा जागर या सांस्कृतिक कार्यक्रमात तल्लीन झाले. सोमवारी विर्सजन मिरवणुक आहेर गार्डन ते जाधव घाट, रावेत येथे करण्यात आले. भरत बारी यांनी सुत्रसंचालन केले. आमदार उमा खापरे यांनी आभार केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"