नि:स्पृह पत्रकाराचा हृद्य सन्मान!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
तळेगाव, प्रतिनिधी : सामाजिक, राजकीय भान ठेवून त्यावर नि:ष्पक्ष भाष्य करणारा पत्रकार हा कुठल्याही मोठ्या साहित्यिकांइतकाच उत्तम साहित्यिक असतो, असे मत तळेगाव येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित किरण परळीकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी – चिंचवड शहरातील शब्दधन काव्यमंच या संस्थेच्या वतीने चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी या अभिनव उपक्रमांतर्गत एमपीसी न्यूजचे संस्थापक- संचालक आणि शहरातले ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक विवेक इनामदार यांचा त्यांच्या तळेगाव येथील निवासस्थानी यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून पं. परळीकर बोलत होते. त्यांच्यासोबत तळेगाव येथील उद्योजक अभिजित इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक दादासाहेब उऱ्हे, विवेक इनामदार यांची आई विजया इनामदार, वडील विजयकुमार इनामदार, पत्नी वैशाली इनामदार, भावजय सीमा इनामदार, पुतणी समीरा इनामदार हे सारे कुटुंब उपस्थित होते.
शहरातले ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक हे नेहमीच शब्दधनच्या अभिनव उपक्रमांसाठी कार्यरत आहेत. त्यांनी केलेले प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या अभिनव उपक्रमांमुळे सर्वपरिचित होतात. याच उपक्रमांतर्गत विवेक इनामदार यांच्या घरी साहित्य सुसंवाद रंगला. अरुण बोऱ्हाडे, सुभाष चव्हाण, अशोकमहाराज गोरे, तानाजी एकोंडे, विवेक कुलकर्णी, फुलवती जगताप, अमरदीप मखामले, हेमंत कंक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.