वारकरी परंपरेच्या साजात, विद्यार्थ्यांच्या सहभागातून मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम!

टाळ–मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘दिंडी
पिंपरी : “मतदार राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो” अशा घोषणानी दुमदुमला परिसर सोबत टाळ–मृदुंगाचा गजर… लोकशाहीच्या मूल्यांचा जयघोष.. महापुरुषांची वेशभूषा साकारलेले विद्यार्थी… वारकरी परंपरेचा साज आणि भक्तिरसाने भारलेले वातावरण… अशी संस्कार, इतिहास आणि मतदानाचे महत्त्व यांचा संगम साधणारी ‘मतदानाची दिंडी’ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील संतपीठ परिसरात काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराने मतदान करणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचा संदेश देण्यात आला.

पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली महापालिका हद्दीत स्वीप कार्यक्रमांतर्गत व्यापक मतदान जनजागृती मोहीम सुरू आहे.
महापालिकेच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा येथे ‘दिंडी-मतदानासाठी ’ हा अभिनव उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. वारकरी परंपरेचा साज चढवलेले विद्यार्थी, टाळ–मृदुंगाच्या गजरात, भक्तिरसाने भारलेले वातावरण, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शाळेच्या परिसरातून निघालेली मतदानाची दिंडी जवळच असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, कॉलनी येथे गेली. त्याठिकाणी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. हा उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळुक यांच्यासह शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचे पालक देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कीर्तनातून सांगण्यात आले मतदानाचे महत्त्व
संतपीठ शाळेतील विद्यार्थिनी ह.भ.प. श्रुती रोडे हिने कीर्तनातून मतदानाचे लोकशाहीतील अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. मतदानामुळे लोकशाही कशी बळकट होते आणि नागरिकांची जबाबदारी कशी अधिक दृढ होते, याचे प्रभावी प्रबोधन या सादरीकरणातून घडले. याच वेळी मतदान जनजागृतीपर पथनाट्यही सादर करण्यात आले.
“हक्क आपल्या मतदानाचा” गीताचे सादरीकरण
संतपीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी “हक्क आपल्या मतदानाचा” हे प्रेरणादायी गीत सादर केले. हे गीत संतपीठ शाळेतील शिक्षकांनी रचले असून, विद्यार्थ्यांना गीत सादर करताना किबोर्ड वादक श्रुती तनपुरे, पखवाज वादक अविनाश भोगील आणि तबला वादक विवेक भालेराव यांनी साथ दिली. या गीताच्या सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी राबवण्यात येत असलेल्या ‘प्रिय आई–बाबा, पत्रास कारण की…’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पत्रांचे वाटप करण्यात आले.

