पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडीचे २५ हॉटस्पॉट

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिस, पिंपरी चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने केलेल्या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडीचे २५ हॉटस्पॉट निदर्शनास आले आहेत. या ठिकाणी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वाहतूक विभागाला दिले आहेत.
राज्यात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि मिळेल त्या कामाच्या निमित्ताने येणाऱ्यांमुळे लोकसंख्या सुमारे ३० लाखांहून अधिक झाली आहे. तर, जवळपास दहा लाख लोकांचा दैनंदिन संपर्क शहराशी येतो. लाखो वाहने दररोज रस्त्यावर धावतात. औद्योगिक परिसरामुळे अवजड वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होते.
औद्योगिक वसाहती, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, मॉल्स आणि इतर सुविधांमुळे शहराची लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण येतो. मागील काही वर्षांत शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढू लागली आहे. नियोजनाअभावी वाहतूक कोंडीची समस्या जटील होऊ लागली आहे. दरम्यान, वाहतूक पोलीस, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. ही ठिकाणे शोधून त्याबाबत उपाययोजना करण्याचे पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी ठरविले आहे.
पिंपरी-चिंचवडसह भोसरी, हिंजवडी, तळवडे, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, निगडी परिसरात सकाळी आणि सायंकाळी सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अरुंद रस्ते, पदपथावरील अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे, बेशिस्त पार्किंग अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
वाहतूक कोंडीची ठिकाणे –
मुकाई चौक, गोडाऊन चौक, फिनोलेक्स चौक, भारत माता चौक, खंडोबा माळ चौक, बोऱ्हाडेवस्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, नाशिक फाटा, लक्ष्मी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी चौक, भुजबळ चौक, ताथवडे अंडरपास, काळा खडक रोड, तळवडे चौक, भुमकर चौक, फिनिक्स मॉल परिसर, काशीद पार्क, भोसरी बस स्टँड, पुनावळे ब्रीज अंडरपास, चिखली चौक, देहू फाटा, टिळक ब्रीज, दापोडी मेट्रो स्टेशन, गणेशनगर चौक, डांगे चौक.