फक्त मुद्द्याचं!

2nd May 2026
शिक्षण

कर्मवीर’ या गोत्राने मी समाजात कार्यरत! :ॲड. सतिश गोरडे

कर्मवीर’ या गोत्राने मी समाजात कार्यरत! :ॲड. सतिश गोरडे

माजी विद्यार्थी मेळावा २०२६ संपन्न
पिंपरी : ‘धार्मिक आणि पवित्र कार्य करताना आपण गोत्र सांगतो; पण सामाजिक कार्यात मी ‘कर्मवीर’ या गोत्राने कार्यरत आहे’ असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ विधिज्ञ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सदस्य आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी ॲड. सतिश गोरडे यांनी रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे शुक्रवार, दिनांक ०१ मे २०२६ रोजी काढले. रयत माजी विद्यार्थी मेळावा २०२६ मध्ये प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले अध्यक्षस्थानी होते.

vcc maharastra din
vcc maharastra din

याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष बाळासाहेब वाघिरे, माजी विद्यार्थी नगरसेवक संजोग वाघिरे, माजी विद्यार्थिनी पत्रकार अश्विनी सातव, विशाल मासुळकर, प्रशांत म्हेत्रे, ॲड देविदास कुदळे, उपप्राचार्या डॉ. कामायनी सुर्वे, उपप्राचार्या डॉ. संगीता अहिवळे, उपप्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. डॉ. नीळकंठ डहाळे, प्रा. मनीषा शिंदे, ॲड. देविदास कुदळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘जन्म कुणाच्याही हातात नसतो. जन्म कुठे होईल? कधी होईल? गरीब अथवा श्रीमंत घरात होईल, हे कोणीच सांगू शकत नाही; पण आपल्या कर्तृत्वाप्रमाणे आपण भरारी घेऊ शकतो. गुरुजनांचा आदर्श घेऊन समाजात चांगले कार्य करावे असे शिक्षण मिळाले. ग्रंथप्रेमातून महापुरुषांची चरित्रे वाचली. सुमारे तेहतीस वेळा हृदयविकाराचा झटका येऊनही कर्मवीर भाऊराव अण्णा हे समाजासाठी आणि शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत राहिले, तसेच माउली लक्ष्मीबाई यांनी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून अण्णांच्या शैक्षणिक कार्याला मदत केली, या गोष्टी मनाला खूप प्रेरणा देऊन गेल्या.

त्यामुळे विधी क्षेत्रात विधिज्ञ म्हणून कार्यरत झाल्यावर गरीब कैद्यांना सोडविण्यासाठी विनामूल्य मदत केली. येरवडा कारागृहात पुरुष कैद्यांची व्यवस्था व महिला कैद्यांची व्यवस्था मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत किरकोळ गुन्हेगार, गरीब, अनाथ आणि केवळ अपघाताने गुन्हेगार ठरलेल्या चौदाशे कैद्यांना मोफत समुपदेशन करून त्यांची मुक्तता केली. भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी पंचाहत्तर मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. त्यापैकी पन्नासावे व्याख्यान माझ्याच महाविद्यालयात देताना झालेला मनस्वी आनंद अजूनही स्मरणात आहे. या माजी विद्यार्थी मेळाव्यात आपण महाविद्यालयासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक सुविधायुक्त नूतन इमारतीचा संकल्प करू या. पुढील वर्षी होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या वेळी या इमारतीचे बांधकाम सुरू झाले असेल यासाठी आपण कटिबद्ध राहू या!’

प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या माजी विद्यार्थी संघाचा गौरव करताना दरवर्षी निरोप न देता १ मे रोजी सर्व माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात हे अभिमानास्पद असल्याचे सांगितले. यावेळी संजोग वाघिरे पाटील आणि बाळासाहेब वाघिरे यांनी संस्थेस देणगी सुपूर्द केली. यावेळी माजी विद्यार्थी संजय तळपदे, प्रशांत गाडेकर, विशाल मासुळकर, सुरेश झिते, सागर पाटील, ओंकार पाटील, विक्रम कांबळे, शरद गायकवाड, नवनाथ हजारे, ओंकार जाधव, अश्विनी सातव व बाळासाहेब वाघिरे यांनी मनोगतातून महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला.

डॉ. कामायनी सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुहास निंबाळकर यांनी महाविद्यालयाबाबत आढावा घेतला. प्रा. डॉ. रूपाली पोखरकर आणि प्रा. काजल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. माजी विद्यार्थी प्रा. संजय पोकळे यांनी आभार मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"