पिंपरीत हॉटेल वेटरने केली मारहाण; तिघे अटकेत!

पिंपरी : रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या दोन व्यक्ती आणि हॉटेलमधील वेटर यांच्यात ऑर्डरवरून वाद होऊन मारहाणीत रूपांतर झाले. याप्रकरणी हॉटेलच्या तीन वेटरांना अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवार चार मे रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पिंपरी साई चौक येथील हॉटेलच्या बाहेर झाली.

याप्रकरणी आशिष जगन्नाथ वाळुंज (वय 30, रा. मेघा हाइट्स, मनीष गार्डन, अजमेरा- नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अब्बास असादुन शेख (वय 30, रा. रौनक हॉटेल समोर, साई चौक, पिंपरी, मूळ रा. बलिया डांगा, जि. नादिया, पश्चिम बंगाल), मोहम्मद अजीज अशांन शेख (वय 21, रा. रौनक हॉटेल समोर, साई चौक, पिंपरी, मूळ -रा. सुखनगर, ता. नाकाशीपाडा, जि. नादिया, पश्चिम बंगाल), पंकज उर्फ बंटी शंकर भूमकर (वय 30, रा. रूम नंबर 19, बिल्डिंग नंबर 12, बौद्ध नगर पिंपरी, मूळ- सर्वे नंबर 2/4 , भुमकर वस्ती, नऱ्हे आंबेगाव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी साई चौक येथील हॉटेल रौनक मध्ये फिर्यादी व त्याचा मित्र मनोज दिलीप पुंड (वय 34) जेवण करण्यासाठी गेले असता फिर्यादी यांनी जेवणाची ऑर्डर केली. नंतर वेटर आजीज याने ओरडून सांगितले की, हॉटेल बंद झाले आहे . त्यामुळे फिर्यादी यांनी त्यास नीट बोलण्यासाठी सांगितले असता चिडून आरोपी यांनी साई चौक येथील रौनक हॉटेलच्या बाहेर फिर्यादी व त्याच्या मित्राला जीवे मारण्याची धमकी दिली. स्वयंपाक करण्याच्या झार्याने व अन्य वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी नागरिकांनी गर्दी केली. मात्र आरोपी क्रमांक एक याने हातातील झाऱ्या जोरात हवेत फिरवून कोणी मध्ये आले तर त्याला सोडणार नाही असे बोलून दहशत निर्माण केली. त्यामुळे नागरिक तेथून निघून गेले. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे तपास करत आहेत.

