दुचाकीची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू!

पिंपरी : होंडा कंपनीच्या एस पी शाईन दुचाकीने एक्टिवा दुचाकीस जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीस डोक्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. ही घटना शनिवार 12 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास देहूरोड परिसरातील झिंगाट मिसळ समोर, के टाउन सोसायटी रोडवर, किवळे, ता. हवेली येथे घडली.
या प्रकरणी महिलेने (वय 40, फ्लॅट नंबर 405, सी 22, स्वागत हाउसिंग सोसायटी, सेक्टर नंबर 17/19 स्पाईन रोड, घरकुल चिखली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .प्रतीक निळकंठ चांदेकर (वय 29, रा. रजनीगंधा सोसायटी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा चुलत भाऊ महादेव शिवपुत्र गावडे (वय 36, रा. फ्लॅट नंबर 1303, सिलॅसटिन सिटी, फेज टू, बिल्डींग नंबर 13, सर्वे नंबर 86/2, रावेत, ता. हवेली) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादीचा भाऊ होंडा कंपनीची एक्टिवा क्रमांक (के ए/ 51 इ एन/ 74 94) या दुचाकीवरून त्याच्या मित्रास भेटून घरी परत येत असताना देहूरोड परिसरातील झिंगाट मिसळ समोर, के टाउन सोसायटी रोडवर त्याच्या समोरून येणारी होंडा कंपनीची एस पी शाईन दुचाकीने (एमएच ३४, सीए/ 89 50 )समोरून एक्टिवा दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांचा चुलत भाऊ महादेव गावडे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख हे तपास करीत आहेत.

तडीपार गुन्हेगाराकडे सापडले पिस्टल; आरोपीस अटक!
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना तडीपार गुन्हेगाराने स्वतःजवळ लोखंडी गावठी बनावटीचा पिस्टल व एक जिवंत काडतूस जवळ बाळगल्याने पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिवार वस्ती, मारुंजी, ता. मुळशी येथे सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली.
याप्रकरणी मिनीनाथ सूर्यभान पवार पोलीस शिपाई हिंजवडी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय 26, अजंठा नगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी आरोपीस पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड हद्दी मधून दोन वर्षाकरिता तडीपार केले असताना आरोपी पिंपरी चिंचवड हद्दीत बेकायदेशीरपणे आढळून आला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी आरोपीकडे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस मिळून आले. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी हे तपास करत आहेत.

