महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणारे सराईत जेरबंद!

दोन चोरट्यांसह अल्पवयीन मुलगा ताब्यात
पिंपरी : महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या संशयीताचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने तब्बल 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून दहा दिवसाच्या पाठपुराव्यानंतर दोन संशयीतांना अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि चोरीची दुचाकी जप्त करून दोन गुन्हे उघडकिस आणण्यात आले .

इंदर अनिल राजपूत (वय 22, रा. आदर्श नगर, मोशी), महेश कान्हा राजपूत (वय 26, रा. मोहननगर, गोडाऊन चौक, मोशी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल साखळीच चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट तीन कडून समांतर तपास सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सुमारे 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून संशयीतांचा सलग 10 दिवस माग काढला. बुधवार 23 सप्टेंबर संशयित मोशी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संघर्ष कॉलनी येथे शोध घेऊन तिघांना ताब्यात घेण्यात आले
चौकशीत त्यांनी सेक्टर क्रमांक चार, प्राधिकरण, मोशी येथे रात्री महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकवल्याची तसेच पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील साखळी चोरीचा आणि जेजुरी पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. संशयीतांवर यापूर्वी दिघी, एमआयडीसी भोसरी, चाकण आणि वाकड पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बालाजी चोनापल्ले तपास करीत आहेत.

