पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास शासनाची मान्यता!

गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण ,सार्वजनिक सुरक्षेसाठी अत्याधुनिक एआय- निगराणी यंत्रणा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञानाधारित पोलिसिंग उपक्रमांना मोठी चालना मिळाली असून, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने (HPC) संपूर्ण पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय क्षेत्रासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पास मान्यता दिली आहे. ही मान्यता राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक व नागरी भागात कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहराच्या वेगवान नागरीकरणाच्या व वाढत्या लोकसंखेच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यावर भर दिला आहे.त्याचाच एक भाग म्हणून सहा नवीन पोलिस ठाण्यांची स्थापना, दहा सहाय्यक पोलिस आयुक्त, पाच पोलिस उप- आयुक्त आणि एका अतिरिक्त पोलिस आयुक्त पदाची निर्मिती करून त्या पदावर सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहें. तसेच पोलिस आयुक्तालयाची नवीन इमारत, पोलिस ठाण्यांच्या नवीन इमारती तसेच प्रशस्त पोलीस परेड(संचलन) मैदान, सुसज्ज नवीन मोटार परिवहन विभाग व पोलिस विभागच्या विविध नवीन कार्यालय उभारणीसाठी आवश्यक असणारी जमीन संपादित करण्यात आली आहे.या पायाभूत सुविधासोबतच पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या अत्याधुनिकीकरणाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून नुकताच मंजूर झालेला सीसीटीव्ही निगराणी प्रकल्प
हा संपूर्ण आयुक्तालयात एकात्मिक व केंद्रीकृत व्यवस्था निर्माण करणार आहे. या प्रकल्पामध्ये पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी मिशन व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत बसविण्यात आलेले विद्यमान सीसीटीव्ही कॅमेरे एकत्रित करण्यात येणार असून, महत्त्वाच्या व अद्याप कव्हरेज नसलेल्या भागांमध्ये नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत चाकण एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी आणि भोसरी एमआयडीसी यांसारख्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांसह हिंजवडी आयटी हबमध्ये या सी. सी. टी.व्ही. मार्फत विशेष निगराणी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर देहू व आळंदी या धार्मिक तीर्थक्षेत्रांमध्ये, सण-उत्सव तसेच पालखी मिरवणूकीच्या कालावधीत लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता या गर्दीचे प्रभावी नियोजन व सुव्यस्थित वाहतूक व्यवस्थापन करता यावे यासाठी सीसीटीव्ही व्यवस्थेचे मजबूत जाळे उभारण्यात येणार आहे.
या सीसीटीव्ही. प्रकल्पा मध्ये एआय-आधारित प्रगत व्हिडिओ अॅनालिटिक्सचा वापर करण्यात येणार असून या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राबविण्यात येणारा हा प्रकल्प गुन्हे शोध, गुन्हे तपास, वाहतूक नियमांची अंमलबजावणी, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पोलिस आयुक्तालयात अत्याधुनिक एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यात येणार असून, यामधील थेट दृश्ये सर्व परिमंडळ पोलिस उप-आयुक्त, वाहतूक विभाग व पोलिस ठाण्यांना उपलब्ध राहणार आहेत.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समिती (PIC) स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये पीसीएमसी, PMRDA, स्मार्ट सिटी, एमआयडीसी व पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड पोलिस दलाने पायाभूत सुविधा विकास व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर सातत्याने भर दिला आहे. या सीसीटीव्ही प्रकल्पास मिळालेली (HPC ची )मान्यता ही नागरिकांमध्ये सुरक्षिततेची व पोलिसांप्रति विश्वासार्हतेची भावना निर्माण होण्यास तसेच सुरक्षित व स्मार्ट पिंपरी-चिंचवड शहर घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
प्रकल्प अंमलबजावणी समिती (PIC)
1. पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड – अध्यक्ष
2. महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका – सदस्य
3. महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण -सदस्य
4. सहपोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड – सदस्य
5. अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड – सदस्य
6. मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड – सदस्य
7. पोलिस उप- आयुक्त मुख्यालय, पिंपरी-चिंचवड – सदस्य
8. पोलिस उप- आयुक्त गुन्हे, पिंपरी-चिंचवड – सदस्य
9. पोलिस उप- आयुक्त वाहतूक, पिंपरी-चिंचवड – सदस्य सचिव
10. सहाय्यक पोलिस आयुक्त, PCIT पिंपरी-चिंचवड – सदस्य
11. DIT महाराष्ट्र शासन प्रतिनिधी – सदस्य
12. एमआयडीसी प्रतिनिधी – सदस्य

