जमिनीच्या वादातून माण मध्ये टोळक्याचा धुडघूस; सुरक्षारक्षकाला मारहाण!

पिंपरी : जमिनीच्या वादातून माणगाव ता. मुळशी येथे टोळक्याने धुडगूस घालून दोन जेसीबीच्या साह्याने पत्र्याचे कंपाउंड ,बांधकामाचे फाउंडेशन आणि ब्रिक वर्क पाडून पाच लाख रुपयांचे नुकसान केले. ही घटना शनिवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पार्थ मोहन रिसवडकर (वय 34, रा. औंध) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आय व्ही रेड्डी, गणेश माने, कुलदीप पाटील आणि अन्य दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीची मिळकत बळकवण्याच्या उद्देशाने दोन जेसीबीच्या साह्याने घटनास्थळी असलेले पत्र्याचे कंपाउंड, बांधकामाचे फाउंडेशन, ब्रिक वर्क पाडून टाकले. आरोपींनी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे ही फोडले. यावेळी प्रतिकार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. फिर्यादीचा भाऊ विक्रांत यांच्या अंगावर धावून जात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेचे चित्रीकरण होऊ नये म्हणून टोळक्याने घटनास्थळी सुरक्षेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.

बनावट ई-मेलद्वारे कंपनीची फसवणूक!
पिंपरी : कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडी सारखा बनावट ई-मेल तयार करून पाच लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. ही घटना एक ते तीन जुलै 2026 या कालावधीत काळेवाडी फाटा वाकड येथे प्राईड पर्पल स्क्वेअर येथे घडली.
याप्रकरणी एका 40 वर्षीय महिला कर्मचाऱ्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या एक्वाकेम लॅब्रोटरीज कंपनीला सिल्वर नायट्रेटच्या कोटेशनची माहिती हवी होती. आरोपीने बनावट ई-मेलवरून पाच लाख 56 हजार 63 रुपयांचे प्रोफोर्मा इन्व्हाईस आणि बँक खाते पाठवले. त्यावर विश्वास ठेवून कंपनीने पाच लाख रुपये संबंधित खात्यात वर्ग केले. परंतु मूळ पुरवठादार कंपनीला पैसे मिळाले नसल्याचे उघड झाले. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंके व पोलीस उपनिरीक्षक आघाव तपास करत आहेत.

