डेव्हलपर कंपनीचा फ्लॅट बुक करायला लावून 23 लाख 8 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : विस्टेरिया रियल व्हिजन मध्ये सेल्स हेड पदावर नोकरी करणाऱ्या व्यक्तीने सेल्समँडेड एजंट संदर्भात कोणताही करारनामा केलेला नसताना एका व्यक्तीला डेव्हलपर कंपनीचा फ्लॅट बुक करायला लावून 23 लाख 8 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 30 एप्रिल 2025 ते आज पर्यंत ‘अठरा मॅग्नेट प्रोजेक्ट’ पुनावळे ता. मुळशी येथे घडली.

याप्रकरणी ऋषिकेश शिवाजी आहेर (वय 30, रा. संतोष तायडे यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने ए- दोन / 06, बोरा हॅपी होम, जगताप डेरी जवळ पिंपळे निलख, मूळ पत्ता- मानस फ्लॅट नंबर 51, हनुमान चौक, नाशिक) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सारंग भारत बोरा (वय 37, मूळ- प्लॉट नंबर 75, श्री पार्श्व सरसनगर ,संदीप नगर ,अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने ’18 मॅग्नेट प्रोजेक्ट’ पुनावळे या ठिकाणी विस्टेरिया रियल व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत सेल्स हेड पदावर नोकरी करीत होता. डेव्हलपर व विस्टेरिया व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये सेल्समँडेड एजंट संदर्भात कोणताही करारनामा केलेला नसताना आरोपी याने फिर्यादीला सदर प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट नंबर बी- 105 बुक करायला लावला. सदर फ्लॅट करिता फिर्यादी कडून 30 एप्रिल 2025 ते 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 29 लाख 33 हजार 200 रुपये रोख स्वरूपात व वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाईन स्वरूपात घेऊन त्यातील फक्त 6 लाख 25 हजार दोनशे रुपये रक्कम जीडी स्क्वेअर डेव्हलपर, यांना दिली. उर्वरित रक्कम 23 लाख 8 हजार रुपये परस्पर स्वतः वापरली. फिर्यादीला विकलेल्या फ्लॅटचे खरेदीखत करून न देता फिर्यादीचा व इतर वर नमूद लोकांचा विश्वासघात करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. रावेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार हे तपास करत आहेत.

