बनावट कागदपत्राच्या आधारे सदनिकेची विक्री करुन फसवणूक!

पिंपरी : बांधकाम प्रकल्पातील सदनिका स्वतःच्याच मालकीच्या असल्याचे भासवून आणि महारेरा रजिस्ट्रेशनची कागदपत्रे लपवून एका व्यावसायिकाची 55 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 5 सप्टेंबर 2024 ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत पाषाण येथील वंशज प्रेस्टीज येथे घडली.

या प्रकरणी रामनाथ विष्णू लवांडे (वय 45, पाषाण) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल व्ही. लांवड (पिंपळे गुरव), संजय विठ्ठल देवकर (नवी सांगवी), वृषाली कल्याणगिरी (बालेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित फर्म कायदेशीर रित्या हस्तांतरित झालेली असतानाही आरोपींनी संगणमत करून प्रकल्पातील सि-विंगमधील तीन सदनिका स्वतःच्या मालकीच्या असल्याचे भासवून महारेरा रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांची सर्व माहिती न जोडता केवळ पहिल्या पत्राची झेरॉक्स प्रत जोडून आणि जुने दस्त अस्तित्वात आणून उपनिबंधक कार्यालयात खरेदी खत करून दिले. यातून फिर्यादीची 55 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. बावधन पोलीस पुढील तपास करत आहेत.

