ऑनलाइन फसवणुकीतून मिळवलेली रक्कम विविध व्यक्तींच्या खात्यामध्ये जमा करून फसवणूक!

पिंपरी : ऑनलाइन फसवणुकीतून मिळवलेली रक्कम विविध व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये कोड व विविध बँकांचे डेबिट कार्ड वापरून फिर्यादीच्या खात्यामध्ये जमा करून एक लाख आठ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 3 ते सात सप्टेंबर 2026 या कालावधीत शितोळे पेट्रोल पंप नवी सांगवी इथे घडली.

या प्रकरणी उद्धव मोतीराम गाजरे (वय 37, रा. फ्लॅट नंबर 304, राजगड तीन ,गजानन महाराज मंदिराशेजारी, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सालीम सन ऑफ फजरुद्दीन (वय 19, रा. केअर ऑफ फैजरूद्दीन ननगल मौजिया, नूरनगर, अलवर, राजस्थान), हेमंत धरमसिंग विश्वकर्मा (रा. कुंदन नगर ,कासारवाडी, व त्यांचे इतर साथीदार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एक ते तीन यांनी त्यांचे इतर साथीदार यांच्या संगनमताने कट रचून ऑनलाइन फसवणुकीतून मिळवलेली रक्कम विविध व्यक्तींच्या बँक खात्याची कोड व विविध बँकांची डेबिट कार्ड वापरून फिर्यादींच्या खात्यामध्ये जमा केली. त्यानंतर दवाखान्यात उपचाराची तातडीची गरज आहे. फायनान्स कंपनीने गाडी ताब्यात घेतली आहे अशी खोटी कारणे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादी कडून त्या रकमेच्या बदल्यात रोख पैसे घेतले.
यामध्ये फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँक खात्यात 41 हजार दोनशे रुपये जमा करून फिर्यादी कडून तेवढीच रोख रक्कम घेण्यात आली. तसेच गौरव दिलीप शेळके यांच्या पत्नीच्या खात्यात पेट्रोल पंपावरील कार्ड स्वाईप व्यवहाराद्वारे अनुक्रमे 30 हजार, सात हजार, 30 हजार अशी एकूण 67 हजार रुपये जमा करून गौरव शेळके यांच्याकडून तेवढी रोख रक्कम घेण्यात आली. अशा प्रकारे फिर्यादी कडून एकूण एक लाख आठ हजार दोनशे रुपये रोख रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

