Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

खाजगी कंपनीकडून 25 लाख रुपयांची खंडणी स्वीकारणारे चार आरोपी जेरबंद!

खाजगी कंपनीकडून 25 लाख रुपयांची खंडणी स्वीकारणारे चार आरोपी जेरबंद!

खंडणी विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : भोसरी एमआयडीसी एका खाजगी कंपनीच्या प्रतिनिधींना माहिती अधिकाराचा धाक दाखवून कंपनीची कागदपत्रे काढल्याचे सांगत तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन पाच कोटी रुपयांची खंडणी मागून 25 लाख रुपये स्वीकारणाऱ्या चार आरोपींना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

राहुल प्रेम नारायण मिश्रा (वय 38), अल्ताफ उस्मान जानवेकर (वय 53), रमेश भीमा मांजरेकर (वय 39) व सुनील राजेंद्र कानू (वय 35) अशी खंडणी मागणाऱ्या अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी सुनील कानू यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी (एक्सएल सहा) या वाहनातून आरोपी फिर्यादीकडे आले होते. त्यानंतर खंडणीच्या रकमेबाबत चर्चा करण्यात आली. आरोपी राहुल मिश्रा याने फिर्यादी कडून 25 लाख रुपये रोख रक्कम काळ्या रंगाच्या बॅग सह स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींनी मागील सहा महिन्यांपासून कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून कंपनीचे काम योग्य नसल्याचे सांगत तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास पाच कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कंपनीची वाट लावण्याची व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत खंडणी विरोधी पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली.

उद्योजक व व्यावसायिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी
उद्योजक व व्यावसायिकांनी कोणत्याही दबावाला किंवा धमकीला बळी न पडता अशा घटनांची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. प्राप्त तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीची चौकशी व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रात उद्योजक व्यावसायिक कामगार व विविध आस्थापनांना धमकावून खंडणी मागणाऱ्या तसेच दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पिंपरी चिंचवड पोलिसांनी शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध कठोर व प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. खंडणी संदर्भात नागरिकांनी व उद्योजकांनी तात्काळ खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेची हेल्पलाइन क्रमांक 75 17 75 17 593 593 या क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग अवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अंमलदार अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, किशोर कांबळे ,प्रदीप पोटे, किरण जाधव, चंद्रकांत जाधव, प्रदीप गोडांबे, दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"