Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
पुणे

पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवासी सुरक्षितता व कार्यक्षमतेवर भर!

पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवासी सुरक्षितता व कार्यक्षमतेवर भर!

अपघातातील जखमींना १ लाख, मृत्यू झाल्यास ३ लाखांपर्यंत मदत
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवासी सुरक्षितता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता, बस अपघातांतील नुकसानभरपाई, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, निविदा व लेखापरीक्षणासह विविध प्रशासकीय व आर्थिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएमएलच्या बस पासमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.

viara vcc
viara vcc

बैठकीस पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे स्थायी समिती सभापती श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, संचालक शैलेश खेडेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आवाड यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा; बस पासमध्ये ५० टक्के सवलत
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएमएलच्या बस पासमध्ये ५० टक्के सवलत लागू करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून सार्वजनिक वाहतुकीचा वापर त्यांच्यासाठी अधिक सुलभ व परवडणारा होणार आहे.

बैठकीत प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बसेसमध्ये डॅशकॅम बसविण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. बसमधील तसेच मार्गावरील घटनांची वस्तुनिष्ठ नोंद उपलब्ध होण्यासह अपघात अथवा अन्य अनुचित घटनांच्या वेळी वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

अपघातातील जखमींना १ लाख; मृत्यू झाल्यास ३ लाखांपर्यंत आर्थिक मदत
पीएमपीएमएलच्या बस अपघातांमध्ये मृत्यू अथवा दुखापत झाल्यास संबंधितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईबाबत निश्चित व सुस्पष्ट धोरण आखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बस अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस १ लाख रुपयांपर्यंत, तर दुर्दैवी मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसांना ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अपघातात मालमत्तेचे नुकसान झाल्यास शासकीय मूल्यमापनानुसार नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकरणांमध्ये कार्यवाही अधिक सुसूत्र, पारदर्शक व संवेदनशील पद्धतीने करून प्रवासीहिताचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आला.

शहरांच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन बसेसची उपलब्धता, प्रवासी संख्येनुसार बसफेऱ्यांचे नियोजन, मेट्रो व अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पूरक फीडर सेवा अधिक सक्षम करणे तसेच बसेसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करणे, या बाबींचाही आढावा घेण्यात आला. उपलब्ध बस ताफ्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करून नागरिकांना वेळेवर, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

३७ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय
यासोबतच महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने पात्र कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी विषय तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रशासकीय विषयांचा विचार करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर नियमांच्या चौकटीत सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. तसेच ३७ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

“पीएमपीएमएल ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बस पासमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख निर्णय आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ व परवडणारा होईल. त्याचबरोबर अपघातातील जखमींना १ लाख आणि दुर्दैवी मृत्यू झाल्यास ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक ठोस सुरक्षाकवच मिळेल. — रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"