पत्नीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तडीपार पतीला अटक!

पिंपरी : दिव्यांग पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत तिच्यासोबत अश्लील कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तडीपार असलेल्या पतीला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार मंगळवार एक ऑगस्ट रोजी उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी आळंदी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपरीचा कालावधी संपण्यास दहा दिवस शिल्लक असतानाच तो शहरात दाखल झाला.
पीडित महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. त्यानंतर तिची आरोपीची ओळख होऊन प्रेम संबंध निर्माण झाले. सहा वर्षांपूर्वी दोघांनी एका मंदिरात विवाह केला. त्यांना एक मुलगा असून काही दिवसापासून दोघे वेगवेगळे राहत होते. मुलगा कोणाकडे राहणार यावरून मागील आठ महिन्यापासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. या वादातून आरोपीने महिलेला एका हॉटेलमध्ये नेले , तेथे तिच्यासोबत अश्लील कृत्य करत व्हिडिओ चित्रीकरण केले. तिचा चेहरा विद्रूप करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले.
पीडितेने सुरुवातीला वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथून तिला पिंपरी पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. भारतीय न्याया संहिता आणि आयटी कलम 66 डीनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पिंपरी पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

