पिंपरी-चिंचवड म्हणजे सिटी ऑफ होप

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ सिटी ऑफ होप हे शहर कोणते असेल तर ते म्हणजे नागरिकांच्या स्वप्नांना मूर्त रूप देणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुमारे सतराशे कोटी रुपये खर्चाच्या ३५ प्रकारच्या प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि उद्घाटन पवार यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून झाले. त्या वेळी ते बोलत होते. पिंपळे गुरव येथील नाट्यसम्राट निळू फुले रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, योगेश बहल, नाना काटे, माई ढोरे, डॉ. स्वाती मुजुमदार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह उपस्थित होते.
औद्योगिक नगरीसह कष्टकऱ्यांची नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा अतिशय झपाट्याने विकास होत असल्याचे नमूद करून पवार म्हणाले, राज्याचे ग्रोथ इंजिन असलेल्या या शहरात नागरिकांना आधार आणि रोजगार उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने नियोजनबद्ध विकास होण्यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत. पालिकेने विकासाची गती चांगली ठेवली आहे. या प्रवासात लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या पीएमपीएमएलच्या आरक्षित जागेत माता रमाईंचा पुतळा उभा करून उचित स्मारक करण्याच्या सूचना पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. शहरात समतोल विकास राखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रास्ताविक आयुक्त सिंह यांनी केले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी आभार मानले. विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
विकृतांचा बंदोबस्त करा
पुण्यातील कायदा-सुव्यवस्था चांगलीच राहिली पाहिजे. त्यामध्ये चूक राहता कामा नये. त्यासाठी समाजातील विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींचा कडक बंदोबस्त करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनाला सकाळी झालेल्या बैठकीत केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली आहे, त्याचे पालन झाले पाहिजे. सर्वांना खुलेपणाने फिरता आले पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. तसेच चुकीचे प्रकार आणि गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला.
कोणते आहेत प्रमुख प्रकल्प?
- मुळा नदीकाठ सुधार प्रकल्प
- इंडिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर
- बोपखेल मुळा नदीवरील पूल
- सांगवी-बोपोडी मुळा नदीवरील पूल
- आर्थिक दुर्बल घटकांसाठी सदनिका
- तळवडे बायोडायव्हर्सिटी पार्क
- आकुर्डी फूड कोर्ट, हरित सेतू प्रकल्प
- स्व. शंकर गावडे स्मृती कामगार भवन