फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

सेवांमधील सुसूत्रतेसाठी सूक्ष्म नियोजन करा

सेवांमधील सुसूत्रतेसाठी सूक्ष्म नियोजन करा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : सेवा हमी कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच सेवांमध्ये अधिक सुसूत्रता व सुलभता आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश आयुक्त शेखऱ सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सेवा हमी कायद्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. या सेवांच्या माध्यमातून नागरिकांना दाखले आणि सुविधा पुरविणे आवश्यक आहे. याबाबत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आयुक्तांनी बैठक घेतली. आढावा बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ”महापालिकेशी संबंधित विविध सेवा नागरिकांना वेळेत देण्यासाठी नियमावली आणि कालावधी निश्चित केला आहे. प्रक्रियेची अंमलबजावणी करताना वेळोवेळी आढावा घेऊन त्यातील उणीवा दूर करण्यासाठी प्रत्येक विभागाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.”

कोणत्या सेवा मिळतात?
सेवा हमी कायद्याअंतर्गत विविध प्रकारच्या सेवा देण्यात येतात. जाहिरात किंवा आकाशचिन्ह नूतनीकरण, व्यवसाय बदलणे, व्यवसायाचे नाव बदलणे, व्यापार किंवा व्यवसायाकामी साठा करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, सिनेमा चित्रीकरण परवाना, सिनेमा चित्रीकरण परवान्याचे नूतनीकरण, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, जलनि:स्सारण जोडणी देणे, अग्निशमन अंतिम ना हरकत दाखला देणे, बांधकाम परवानगी देणे अशा विविध सेवा दिल्या जातात.

खाद्यनोंदणी प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना हरकत प्रमाणपत्र देणे, राज्याच्या खाद्य परवान्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, रस्ता खोदाई परवाना देणे आदी सेवांचा समावेश आहे. शहरात महापालिकेची एकूण ९४ नागरी सुविधा केंद्रे आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली. ‘नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या संदर्भात विभागनिहाय माहिती सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती उपआयुक्त राजेश आगळे यांनी दिली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"