फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
आरोग्य

चॉकलेट वाढवते मेंदूची कार्यक्षमता?

चॉकलेट वाढवते मेंदूची कार्यक्षमता?

लहान मुलांपासून आपण चॉकलेट हमखास लांब ठेवतो. दात किडतील असं कारण सांगून, शक्य तितकं मुलांना चॉकलेट देणं टाळलं जातं. गोड पदार्थ म्हणूनही अनेकजण चॉकलेट खाणं टाळतात. पण आपल्या शरीराला चॉकलेट खाण्याचे फायदे सुद्धा आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?

आजवर आपण चॉकलेट खाण्याचे अनेक तोटे ऐकले आहेत किंवा काही जणांनी अनुभवलेही असतील. दातांमधून कळ येणे, चॉकलेटचे कण दातांमध्ये अडकून राहणे आणि अचानक चॉकलेट खाताना दात ठणकणे असा अनुभव अनेकांना आला असेल. पण आज या चॉकलेटच्या खाण्यामुळे शरीराला होणारे फायदे नेमके काय आहेत, हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

चॉकलेटमध्ये एसणारे फिनोलॅमिन्स मुळे मूड सुधारतात आणि तणाव कमी करतात. विशेषतः महिलांना मूड स्विंगच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अशातच निराश वाटणं, कंटाळा येणं किंवा एका मूडमधून अचानक दुसरंच काही तरी वाटणं, अशा वेळी चॉकलेट खाऊन पाहिलं तर फरक पडू शकतो, असं काही जण सांगतात. कारण चॉकलेट आपल्या मनावरचा ताण कमी करते.

चॉकलेटमध्ये असणारे फ्लेव्होनॉइड्स मेंदूची कार्यक्षमता वाढवते. अनेकांना काही कल्पक गोष्टी जेव्हा करायच्या असतात. काही लिखाण करायचं असेल, पेंटिंग करायचं असेल तेव्हा ही मंडळी आवडीने चॉकलेट खातात. आणि त्यानंतर खरंच बदल घडतो, असा काहींचा अनुभव आहे. त्यामुळे चॉकलेट खाल्ल्यावर मेंदूची कार्यक्षमता वाढते, असंही सांगितलं जातं.

डार्क चॉकलेट हे चवीला तुलनेनं थोडं कडू लागतं. त्यामुळे काही जण हे चॉकलेट टाळतात. तर काही जणांना डार्क चॉकलेट आवर्जून आवडतं. यामध्ये असणारे अँटी ऑक्सिडन्ट्स हृदयाच्या आजारांचा धोका कमी करतात.

चॉकलेटमध्ये असणारे शुगर आणि कार्बोहायड्रेट्स शरीराला त्वरीत ऊर्जा देतात. चॉकलेट खाल्ल्यानंतर जशी मेंदूची कार्यक्षमता वाढते, तसंच त्यातून शरीराला सुद्धा ऊर्जा मिळते. त्यामुळे काम करण्यासाठी उत्साह येतो.

त्वचेची निगा राखण्यासाठी सुद्धा चॉकलेटचा वापर केला जातो. चॉकलेटमध्ये असणारे अँटिऑक्सिडन्ट्स त्वचेला तरूण आणि चमकदार बनवतात. वॅक्स करताना त्वचेवरचा टॅन घालविण्यासाठी चॉकलेटचा वापर करण्याची पद्धत आहे. काळवंडलेली त्वचा उजळ होण्यास यामुळे मदत होते.

दूध आणि पांढऱ्या चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याचे आरोग्याला फायदे अधिक असतात. चॉकलेटमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते मर्यादित सेवन केले पाहिजे. अन्यथा वजन वाढण्याचा धोका असतो. काही जण वजन आवर्जून वाढविण्यासाठी सुद्धा चॉकलेट खातात.

मात्र, कोणताही आजार असणाऱ्यांनी किंवा मधुमेह, उच्चरक्तदाब, आणि हृदयाच्या आजरांनी ग्रस्त रुग्णांनी मात्र वैद्यकीय सल्ल्याशिवाय चॉकलेटचे सेवन करू नये, असे तज्ज्ञ सांगतात.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"