राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला दुष्काळ जाहीर!

राज्यात 75 टक्के, 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामुळे 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवार 26 सप्टेंबर रोजी हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पालकमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी देखील एक दिवस दुष्काळी दौरा केला होता. दुसरीकडे विरोधकांनी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी लावून धरली होती. आदित्य ठाकरे हे नुकतेच दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारही लवकरच दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने राज्यातील 75 टक्के भागात दुष्काळाच्या विविध उपाय योजना जाहीर होऊन त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

शेतकऱ्यांना फायदा
दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना फायदा मिळेल यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरू करणार, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टॅंकर्स, टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित होणार नाही, शेतीवर अस्रित शेतकरी, शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार, जनावरांच्या चाऱ्यांची व्यवस्था करणार, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरूच ठेवणार, पंचनामेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश.
राज्यात यंदा फक्त जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण वाढले होते. जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात दडी मारल्याने सरासरीपेक्षा या महिन्यात पाऊस कमी पडला. यामुळे शेतातील पिके करपली, पिण्याच्या पाण्याचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी नागरिक यांचा दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारकडे रेटा चालू होता. सरकारने देखील दुष्काळ जाहीर करून मदतीचा हात पुढे केला आहे.

