कोयत्याचा धाक दाखवून कार चालकाला लुटले; दोघांना अटक!

पिंपरी : कोयत्याचा धाक दाखवून कार अडवून चालकाकडील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत आणखी पैशाची मागणी करण्यात आली. डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी हॉटेल समोर घडली.
याप्रकरणी संतोष लक्ष्मण शेडगे (वय 40, रा. चिखलसे, कामशेत, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. अरविंद अमरेश कोळी (वय 22, रा. सोमाटणे फाटा, मावळ), शुभम हनुमंत कोळी (वय 25, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेडगे हे चार चाकीतून जात असताना आरोपींनी त्यांची कार अडवली. त्यांच्याकडील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत आणखी पैशाची मागणी केली. त्यांना वाहनातून खाली ओढल्यानंतर एका आरोपीने कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तळेगाव पोलीस तपास करत आहेत.

घातक शस्त्र तलवार जवळ बाळगल्याने अटक!
पिंपरी : बेकायदेशीरपणे कोणतीही परवानगी नसताना तलवार बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवार पाच सप्टेंबर रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास किन्हई गावच्या हद्दीत करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल वेताळ यांनी फिर्यादी दिली आहे. सोनू उर्फ अशीतोष दिगंबर एकलारे (वय 24, रा. विघ्नहर्ता सोसायटी, देहूगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचवली ते किन्हई रस्त्याच्या कडेला ऐकलारे संशयितरित्या थांबला होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपये किंमतीची लोखंडी तलवार मिळून आली. कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना तसेच बंदी आदेशाचे उल्लंघन करून तलवार बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

