भाजपाचा देखील पिंपरी विधानसभा मतदारसंघावर दावा

पिंपरी : शिवसेनेनंतर आता भाजपने पिंपरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. पिंपरीचा उमेदवार कमळाचा असावा अशी भाजपची आग्रही मागणी आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही मागणी केली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मोरवाडीतील भाजप पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी पिंपरीची जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली. आमदार उमा खापरे,आमदार अमित गोरखे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, प्रवक्ते राजू दुर्गे, संजय मंगोडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
पिंपरीची जागा भाजपची आहे. 2009 मध्ये अमर साबळे उमेदवार होते. त्यांचा निसटता पराभव झाला. नंतर मतदारसंघ आरपीआयला सुटला. भाजपची ताकद आता ताकद दुपप्ट झाली आहे. पिंपरी मतदारसंघात भाजपचे 14 माजी नगरसेवक आहेत. लोकसभेलासुध्दा महायुतीच्या खासदारांना आम्ही 17 हजारांची आघाडी दिली. त्यामुळे पिंपरी मतदारसंघ भाजपलाच मिळाला पाहिजे, अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना असल्याचे आमदार खापरे म्हणाल्या. आमदार गोरखे म्हणाले, पिंपरीची जागा भाजपलाच मिळाली पाहिजे. पिंपरीत भाजपचे उत्तम संघटन आहे. भाजपच्याच कार्यकर्त्याला इथे संधी द्यावी आणि कमळ चिन्हच पाहिजे अशी आग्रही मागणी आहे.
सदाशिव खाडे म्हणाले, आम्हाला कमळावर मतदान करायची संधी मिळावी असे कार्यकर्ते म्हणतात. आमचा कोणा व्यक्तीला विरोध नाही. राजू दुर्गे म्हणाले, आम्हाला काही झाले तरी कमळ चिन्हा द्यावे हा आग्रह सर्वांनी धरला. लोकसभेला आम्हाला कमळ चिन्ह नाही दिले. आतासुध्दा ते नसेल तर भाजप पिंपरीत जीवंत कशी राहणार? असा सवालही त्यांनी केला.