हिंदू विरोधी विचारांना बळ देण्यामागे शरद पवार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. शरद पवारांनी सर्व विधानांना पाठींबा दिल्याचा आरोप करत सकल हिंदू समाज संघटनांनी ज्ञानेश महाराव आणि शरद पवारांविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन केले. यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजप आणि सकल हिंदू समाज संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डांगे चौक येथे शरद पवारांविरोधात निषेध नोंदवण्यात आला. जसा पाकिस्तान आतंकवाद पोसतो, तसा हिंदू विरोधी विचार आणि माणसं शरद पवार पोसतात. आयसीस, पीएफआय सारख्या संघटनांकडून हिंदू धर्माला धोका आहे. तसाच शरद पवारांपासून हिंदू धर्माला धोका आहे. हिंदू विरोधी विचार करण्याचे आणि त्याला बळ देण्याचे कार्य शरद पवार करतात. हिंदू विरोधी वक्तव्य करणारा प्रत्येक माणूस शरद पवारांशीच कसा संबंधित असतो? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आमच्या हिंदू देवतांचा अवमान सहन करून घेणार नाही. अवमानकारक वक्तव्य करणा-या ज्ञानेश महाराव आणि त्याला मुख समर्थन देणा-या खा. शरद पवार यांनी हिंदू समाजाची माफी न मागितल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देखील मोरे यांनी दिला.
यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह नरेंद्र पेडसे, प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, आमदार उमाताई खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वार शेडगे, महेश कुलकर्णी, राष्ट्रीय सेविका समितीच्या जिल्हा कार्यवाहीका भारती तारे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, विश्व हिंदू परिषदेचे धनंजय गावडे, नंदकुमार कुलकर्णी, विशाल मासुळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे, प्रदेश सचिव अजित कुलथे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे तसेच सकल हिंदू समाज संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह नरेंद्र पेंडसे म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खा. छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थित ज्ञानेश महाराव याने प्रभू श्रीराम, वारकरी संप्रदाय, आणि स्वामी समर्थ व हिंदू समाजातील महापुरुषांवर चिखलफेक केली. हिंदू धर्माचा अवमान करून एका विशिष्ट धर्माची मते मिळविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून सूरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
आमदार उमा खापरे म्हणाल्या, श्रीराम आणि लक्ष्मण यांचा त्याग आणि अन्य सद्गुण यांमुळे लाखो वर्षांनंतरही ते हिंदूंसाठी आदरणीय आहेत. हिंदू धर्मानुसार श्रीरामांना भगवान श्रीविष्णू, तर लक्ष्मणाला शेष नागाचा अवतार मानले जाते. त्यामुळे त्यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यामुळे हिंदूंमध्ये क्षोभ आहे. शांतताप्रिय, सहिष्णु हिंदु समाजाच्या भावना ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक दुखावल्या आहेत. यामुळे समाजात कोणती अप्रिय घटना घडू नये, यासाठी ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
निवडणुकीसाठी ढोंगी श्रद्धा?
भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके म्हणाले की, हिंदू देवीदेवतांचे अवमान करण्याचा कोणाला अधिकार नाही. ज्ञानेश महाराव आणि पवार यांनी देवतांचा अवमान केला आहे. ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रभू रामचंद्र, विठुराया आणि हिंदूत्वाचा अपमान केला. महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रद्धा दिसून येत आहे. महाराव यांच्या वक्तव्याला पवार यांची संमती असल्याचे यावरून दिसून येते.

