क्षयरोगाविरुध्दच्या लढाईसाठी बीसीजी मोहीम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बीसीजी लस जन्मत: सर्व लहान मुलांना देण्यात येते. बीसीजी लस ही सुरक्षित असून, त्यामुळे लहान मुलांचा गंभीर प्रकारच्या क्षयरोगापासून बचाव होतो. बऱ्याच देशांत सध्या प्रौढांमध्ये होणाऱ्या क्षयरोग प्रतिबंधासाठी बीसीजी लसींचा वापर होत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातही वैद्यकिय विभागामार्फत प्रौढांना बीसीजी लस देण्यात येणार आहे. बीसीजी लस ही सुरक्षित असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवातून दिसून आलेले आहे.
मोहिमेअंतर्गत कोण घेऊ शकते ही लस?
- ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेले सर्व व्यक्ती
- मधुमेह असणारी व्यक्ती
- सध्या किंवा पूर्वी धूम्रपान करणारे व्यक्ती
- मागील ५ वर्षात टीबी आजार झालेल्या व्यक्ती
- जानेवारी २०२१ पासून सक्रीय टीबी रुग्णाच्या संपर्कात असणारे जवळचे सहवासित
- BMI १८ पेक्षा कमी असणारे व्यक्ती
स्वतंत्र लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार
पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात १८ वर्षावरील वर्गासाठी ही लस देण्यात येणार असून, बी. सी. जी. लस देण्यासाठी घरोघर सर्वेक्षण करण्यात आले आहे. एकुण ३,२८,६५७ अपेक्षित, लाभार्थ्यांची नोंद करण्यात आलेली असून, त्यामध्ये २,७८,७०३ लाभार्थ्यांनी ही लस घेण्यासाठी संमती दिली आहे.
जे लाभार्थी संमती देतील त्यांनाच ही लस देण्यात येणार आहे. लस देण्याकरिता मनपाच्या ८, रुग्णालयांमध्ये ३ सप्टेंबरपासून लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत २२२ पात्र नागरिकांनी लस घेतली. पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या लसीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.