फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : जगभरात मंकीपॉक्स झपाट्याने पसरू लागला आहे. ही साथ आता आफ्रिकेतून पाकिस्तानात पोहोचली आहे. आणि मुंबई तसेच पुण्यालाही याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या दोन शहरांमधून परदेशी शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने, ही शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबद्दल काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या जगभरात मंकीपॉक्सचा संसर्ग वाढत असून १४ ऑगस्ट रोजी ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या आजारामुळे मृत्यूचा धोका तीन ते सहा टक्के आहे.
कसा होतो मंकीपॉक्स?
ऑर्थोपॉक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे मंकीपॉक्स हा आजार होतो. उंदिर आणि त्यांच्या काही प्रजातींमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. या विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर माणसांच्या शरीरावर पुरळ येतात. हे पुरळ येण्यापूर्वी एक ते दोन दिवस आधी त्वचेचे फुटेपर्यंत किंवा ते पूर्ण स्वच्छ होईपर्यंत अन्य लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो.
काय आहेत याची लक्षणे?
सूज येणे, ताप, डोके दुखी, अंग दुखी, अति थकवा ही लक्षणे सामान्यतः रुग्णांमध्ये आढळत आहेत. मंकीपॉक्सची लागण झालेल्या देशांमध्ये गेलेले रुग्ण आणि गेल्या तीन आठवड्यात राज्यात आढळलेल्या संशयित रुग्णांमध्ये आरोग्य विभागाचे लक्ष आहे.
सध्या आफ्रिकन देशात या रुग्णांची संख्या वाढते आहे. सध्या पाकिस्तानातही मंकीपॉक्सचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. याच पार्श्वभूीमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यांना त्यानुसार नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. भारतात सध्या एकही रुग्ण आढळला नसल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.