‘पिंपरी-चिंचवड करंडक’ आंतर-क्लब ओपन टी-२० क्रिकेट स्पर्धा!

पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे २० ऑक्टोबरपासून; गुणवंत खेळाडूंना PCPL मध्ये खेळण्याची संधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील क्रिकेट खेळाला चालना देण्याबरोबरच स्थानिक क्रिकेट क्लब आणि नवोदित व गुणवंत खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हक्काचे स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘पिंपरी-चिंचवड करंडक आंतर-क्लब ओपन टी-२० क्रिकेट स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा २० ऑक्टोबर २०२६ पासून फोर स्टार क्रिकेट मैदान, हिंजवडी येथे खेळविण्यात येणार आहे. शहरातील विविध क्रिकेट क्लबचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, टी-२० क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या कौशल्याची आणि गुणवत्तेची चुणूक दाखविण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रुपये २५,००० व चषक, उपविजेत्या संघाला रुपये १५,००० व चषक, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला रुपये ५,००० व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा वैयक्तिक पुरस्कारांनीही खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आगामी पिंपरी-चिंचवड टी-२० प्रीमियर लीग (PCPL) मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील क्रिकेटपटूंसाठी या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
“या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या क्रिकेट क्लब तसेच त्या कार्यक्षेत्रातील खेळाडूंनाच सहभागी होता येणार आहे*. स्थानिक खेळाडूंना अधिकाधिक संधी देणे आणि त्यांच्यातून गुणवंत खेळाडू पुढे आणणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे,” असे पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी सांगितले. “पिंपरी-चिंचवड शहरात क्रिकेटचा विकास व्हावा तसेच स्थानिक क्रिकेट क्लब आणि खेळाडूंना सातत्याने स्पर्धात्मक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी असोसिएशन सातत्याने प्रयत्नशील आहे.
या स्पर्धेमुळे खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळणार असून, भविष्यातील PCPL साठीही गुणवंत खेळाडू निवडण्यास मदत होणार आहे,” असे असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२६ असून, इच्छुक क्लबनी त्यापूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी
अधिक माहितीसाठी संपर्क :
राजू कोतवाल – ९९२२५०२४१४ , सुशील जाधव – 9923231218

