पार्किंगच्या वादातून ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण;दोघांना अटक!

पिंपरी : वाहन पार्क करण्याच्या वादातून 64 वर्षीय जेष्ठ नागरिकाला लाथा बुक्क्यांसह कचऱ्याच्या डब्याने मारहाण करण्यात आली. मारहाणीत त्यांच्या उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले. ही घटना शनिवार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपरीतील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या पार्किंग इमारतीत घडली.
विजय दिनकर येरुणकर (वय 64 रा. जुनी सांगवी, मूळ- महाड, रायगड) यांनी फिर्यादी आहे. आकाश भगवान कळमकर (वय 30) आणि आकाश नानासाहेब जाधव (वय 23, दोघेही रा. चिखली गावठाण) यांना संत तुकाराम नगर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पार्किंगच्या सहाव्या मजल्यावर वाहन लावण्यावरून वाद झाल्यानंतर आरोपींनी येरुणकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. फुटलेल्या टेललॅम्पच्या काचेमुळे त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली. तर मारहाणीत हाताचे हाड फॅक्चर झाले. कचऱ्याच्या डब्याने डोक्यावर व पाठीवर मारहाण करण्यात आली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.

लग्नासाठी तरुणीला मारहाण;मोबाईल फोडला!
पिंपरी : लग्नाच्या उद्देशाने 24 वर्षीय तरुणीचा प्रत्यक्ष तसेच फोनवरून पाठलाग करून तिला मारहाण करण्यात आली. तिचा मोबाईल जमिनीवर उपटून फोडण्यात आला. ही घटना शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी बिजलीनगर, चिंचवड येथे घडली.
तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन राजेंद्र कांबळे (वय 29, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुणीचा लग्नाच्या उद्देशाने प्रत्यक्ष आणि फोनद्वारे पाठलाग करीत होता. शनिवारी त्याने तरुणीला हाताने मारहाण केली आणि तिचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले. चिंचवड पोलीस तपास करत आहे.

