Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

5th October 2026
सांस्कृतिक

‘धरित्रीच्या लेकी’मधून मराठी गीतांमधील स्त्रीभावनेचा सुरेल जागर!

‘धरित्रीच्या लेकी’मधून मराठी गीतांमधील स्त्रीभावनेचा सुरेल जागर!

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त सुरेल कार्यक्रमाने रसिक झाले मंत्रमुग्ध
पिंपरी : अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने गायक धनंजय म्हसकर, अमोल बावडेकर तसेच गायिका योगिता गोडबोले, प्रिती निमकर आणि अनघा पेंडसे यांच्या सहभागातून सादर झालेल्या या कार्यक्रमातून मराठी गीतांमधून व्यक्त झालेल्या स्त्रीच्या विविध भावविश्वाचा सुरेल आविष्कार रसिकांसमोर उलगडला. स्त्रीचे मातृत्व, ममत्व, प्रेम, भक्ती, कर्तृत्व, स्वाभिमान आणि भावविश्व अशा विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या गीतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘धरित्रीच्या लेकी’ हा संगीत कार्यक्रम पार पडला.

viara vcc
viara vcc

कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीला वंदन करणाऱ्या शांता शेळके लिखित ‘जय शारदे वागीश्वरी’ या गीताने झाली. त्यानंतर भक्तिरस, वात्सल्य आणि स्त्रीशक्तीच्या विविध छटा व्यक्त करणारी अनेक गीते सादर करण्यात आली. ‘कौसल्येचा राम बाई’ या भक्तिगीतातून भक्तीभाव, तर ‘गुणी बाळ असा जागसी का रे वाया’ या अंगाईगीतामधून मातृत्व आणि वात्सल्याचा भाव प्रभावीपणे व्यक्त झाला. संतपरंपरेतील भक्तिभाव जागविणाऱ्या ‘माझे माहेर पंढरी’ आणि ‘विठू माऊली तू’ या गीतांनी कार्यक्रमात भक्तिरसाची अनुभूती दिली. त्याचबरोबर मराठी भावगीतांची समृद्ध परंपरा उलगडताना ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’, ‘लाजून हासणे अन् हासून ते पाहणे’, ‘त्याची धून झंकारली रोमारोमांत’, ‘नाविका रे वारा वाहे रे’ आणि ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ यांसारख्या गीतांनी रसिकांना जुन्या मराठी गीतविश्वाची सुरेल सफर घडवली.

indra dairy
indra dairy

ग्रामीण जीवन, प्रेम आणि निसर्ग यांचे चित्र उभे करणाऱ्या ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ या ग. दि. माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके संगीतबद्ध गीताने कार्यक्रमात लोकसंगीताचा रंग भरला. स्त्रीच्या स्वाभिमानाची आणि आत्मभानाची अभिव्यक्ती करणाऱ्या गीतांनाही कार्यक्रमात स्थान देण्यात आले. ‘आम्ही जिजाऊंच्या मुली’ या गीतातून राजमाता जिजाऊंच्या विचारांशी जोडलेली स्त्रीशक्ती प्रभावीपणे अधोरेखित झाली. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर स्वरविश्वातील ‘बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला’ आणि शांता शेळके लिखित, लता मंगेशकर व सुरेश वाडकर यांच्या स्वरातील ‘माझे राणी, माझे मोगा’ यांसारख्या गीतांनी कार्यक्रमाला विशेष भावस्पर्शी उंची मिळवून दिली. ‘बाई बाई, मनमोराचा…’ हे मोहित्यांची मंजुळा चित्रपटातील गीत असून त्याचे संगीत आनंदघन यांचे आहे. सुमन कल्याणपूर यांच्या मधुर स्वरांची आठवण करून देणाऱ्या ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ या भावगीतासह त्यांच्या गीतपरंपरेतील ‘नाविका रे वारा वाहे रे’ या गीताने रसिकांची दाद मिळवली.

कार्यक्रमात ‘नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो’ या गीतातून सहजीवनातील भावबंध, तर ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’ या गीतातून प्रेमभावनेचे लोभस चित्र उभे राहिले. याशिवाय ‘माझे राणी, माझे मोगा’ या गीतातून कोकणी भाषिक लहेजातून व्यक्त झालेला प्रेमभावही रसिकांच्या विशेष पसंतीस उतरला. देवीभक्तीची परंपरा आणि स्त्रीशक्तीचा आध्यात्मिक संदर्भ अधोरेखित करणाऱ्या ‘आईचा जोगवा, जोगवा मागेन’ या पारंपरिक जोगवा रचनेने कार्यक्रमात भक्तिरसाची अनुभूती अधिक गडद केली.

मराठी गीत-संगीताच्या विविध प्रवाहांचा आणि स्त्रीच्या भावविश्वाचा सुरेल पट उलगडत गेलेल्या या कार्यक्रमाची सांगता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शब्दांना स्वरबद्ध केलेल्या ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’ या स्फूर्तिगीताने झाली. लता मंगेशकर यांच्या स्वरातील या गीताने कार्यक्रमाचा समारोप उत्स्फूर्त वातावरणात झाला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"