शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्याकरिता मित्राची चोरली कार!

पोलीसांनी पाठलाग करून धुळे येथे आरोपीला केली अटक; बावधन पोलिसांची कारवाई
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्याकरिता मित्राची कार चोरी करून ती राजस्थानमध्ये विक्री करण्याकरता घेऊन जाणाऱ्या चोरट्यास पाठलाग करून शिरपूर, धुळे येथे ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून 14 लाख रुपयांची होंडा एलिमेंट कार जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपआयुक्त,परि-2 चे प्रदीप जाधव यांनी दिली.

रोहन सत्यनारायण सोमानी (वय 26, रा. बी/ 306, रवीनंदा स्काय लाईट सोसायटी, स्टार बाजार मागे, वाघोली, मूळ – रा.4/ 207, माणिक्य नगर भिलवाडा, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 27 सप्टेंबर रोजी प्रथम सोमेश्वर दास गुप्ता (रा. बावधन) यांनी त्यांची नवीन होंडा एलिवेट कार चोरी झाल्याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरट्याचा शोध घेऊन कार हस्तगत करण्याबाबत वरिष्ठांनी सुचित केले होते. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, यांनी सहाय्यक पोलीस फौजदार बापूसाहेब धुमाळ, पोलीस हवालदार फारूक मुल्ला, पोलीस शिपाई बाबासाहेब पोटे यांना कारचा शोध घेण्याकरिता रवाना करण्यात आले होते. पथकाने सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्याचा माग काढून चोरी केलेली कार पोलिसांना गुंगारा देण्याकरिता प्रथम वाघोली तेथून अहिल्यानगर, संभाजीनगर चाळीसगाव मार्गे धुळे येथे निघाला असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलीस पथकाने आरोपीचा पाठलाग सुरू केला. शिरपूर जिल्हा धुळे येथे सदरची कार व चोरट्यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्याकरिता वडील व इतरांकडून उसने पैसे घेतले व ते पैसे परत देण्यासाठी मित्र प्रथम गुप्ता यांची कार चोरी करून ती राजस्थान येथे जाऊन विक्री करणार होता. बारा तासात कार व आरोपी जेरबंद करून चोरीचा गुन्हा उघड केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार फारूक मुल्ला हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 चे प्रदीप जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त हिंजवडी विभाग विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे परवेज शिकलगार, गुन्हे प्रगटीकरण पथक पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, सहाय्यक पोलीस फौजदार बापूसाहेब धुमाळ, पोलीस हवालदार फारुख मुल्ला, अतिश जाधव, महेश शिंदे, सुहास डंगारे, ऋषिकेश पाटील, दत्तात्रय शिंदे, अक्षय लाटे या पथकाने केली आहे.

