फॉर्च्यूनरवर ‘विधानसभा आमदार लोगो’; दोघा विरोधात गुन्हा!

पिंपरी : फॉर्च्यूनर कारवर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’- आमदार असा लोगो लावून फिरल्याप्रकरणी दोघा विरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .कस्पटे वस्ती येथे गुरुवार 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास वाहन तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी सांगवी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई सुधीर कैलास साबळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बापू मच्छिंद्र ढेरे (वय 35, रा. भोसरी), रोहन जगन्नाथ काटे (रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कस्पटे वस्ती येथील अंम्बियन्स हॉटेल समोर काळ्या काचा असलेली फॉर्च्यूनर कार तपासणीसाठी थांबवण्यात आली. वाहनावर पांढऱ्या- हिरव्या रंगाचा अशोक स्तंभासह महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार असा लोगो लावण्यात आला होता. संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबात कोणीही आमदार नसल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

महिला 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी घेऊन पसार!
पिंपरी : जेवणाचे पार्सल आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या व्यक्तीने विश्वासाने गाडीची चावी महिलेकडे दिली. मात्र ही संधी साधून महिला 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी घेऊन पसार झाली. ही घटना थरमॅक्स चौक येथे गुरुवार 10 सप्टेंबर रोजी घडली.
याप्रकरणी सोनू कुमार मोटूप्रसाद सिंग (वय 36, रा. मोहन नगर, भोसरी) यांनी निगडीत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि संबंधित महिला एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघे दुचाकीवरून नवमी हॉटेल जवळ आले त्यावेळी महिलेने फिर्यादीला हॉटेलमधून जेवणाची पार्सल आणण्यास सांगितले. फिर्यादीने विश्वासाने दुचाकीची चावी तिच्याकडे दिली. यानंतर महिला दुचाकी घेऊन पसार झाली .

