Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

सराईत चेनचोर टोळी जेरबंद; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई

सराईत चेनचोर टोळी जेरबंद; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई

35 लाख 33 हजार रुपये किंमतीचे 27 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत
पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील 13 आणि पुणे शहरातील दोन अशा 15 चेनचोरीच्या गुन्ह्याची उकल गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली आहे. आरोपीकडून 35 लाख 33 हजार रुपये किंमतीचे 27 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

फिदा हुसेन मानुअली इराणी (वय 33, रा. महात्मा गांधी वसाहत, इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे), मुकेश अरुण नेटके (वय 38, रा. गल्ली क्रमांक दोन, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी चिंचवड शहरात वारंवार घडणाऱ्या चेनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सराईत चेन चोराचा माग काढत कारवाई केली. निगडीतील एका चेनचोरीच्या गुन्ह्याच्या तपासात आरोपींच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सुमारे चारशे ते पाचशे सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज तपासून पोलिसांनी मुंबईपर्यंत माग काढला. तपासात 15 चेनचोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील चेनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना विशेष सूचना केल्या होत्या. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या पथकाने चेन चोरीच्या घटनांचा समांतर तपास सुरू केला. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका चेन चोरीच्या तपासात घटनास्थळापासून आरोपी पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या आधारे फिदा इराणी आणि आदित्य मनलोर यांची ओळख पटली. त्यानंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 5 सप्टेंबर रोजी फिदा इराणी याला देहूरोड परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्यासोबत मुकेश नेटके यालाही पोलिसांनी अटक केली.

फिदा इराणीच्या चौकशीत त्याने आदित्य मनलोर, काशीम जाफर हुसेन यांच्यासोबत काही गुन्हे केले. एमआयडीसी भोसरी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, निगडी, रावेत, हिंजवडी, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 13 चेन चोरीसह पुणे शहरातील दोन गुन्ह्यांची उकल या तपासातून झाली आहे. आरोपी फिदा इराणी हा पाच गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे होता. रावेत पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली . त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि चेन चोरीसारखे दहा गंभीर गुन्हे नोंद आहेत.

मुकेश नेटके यांच्या विरोधात अंमली पदार्थ बाळगल्याचा एक गुन्हा नोंद आहे. आदित्य मनलोर हा सध्या रावेत पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. चेन चोरी आणि बतावणीच्या प्रत्येकी पाच गुन्ह्यात पाहिजे असलेल्या तालीब बाबा इराणी (वय 21), आली अब्बास शौकात इराणी (वय 28, दोघे रा. इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे )यांनाही 8 सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना पुणे ग्रामीणच्या यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने 2026 मध्ये आतापर्यंत चेन चोरीचे 32 गुन्हे उघडकीस आणले असून 50 लाख 63 हजार रुपये किंमतीचे 41 तोळे सोने हस्तगत केले आहे. या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीचा आधार घेण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे, श्रेणी पोलीस निरी उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, महेश खांडे, अंमलदार नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, नितीन उंब्रजकर तसेच मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"