Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : आयुक्त डॉ. सूर्यवंशी!

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : आयुक्त डॉ. सूर्यवंशी!

नैसर्गिक सजावट आणि कृत्रिम विसर्जनस्थळांचा, निर्माल्य कुंडांचा वापर करण्याचे आवाहन
पिंपरी : गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या स्वच्छतेची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारावी. गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने साजरा करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.

viara vcc
viara vcc

गणेशमूर्तीची निवड करताना शाडू मातीच्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. जलप्रदूषणाचा धोका लक्षात घेता पीओपीच्या मूर्तींचा वापर टाळून पर्यावरणपूरक मूर्तींची निवड करावी. गणेशमूर्तींचे विसर्जन नदी, नाला अथवा तलावात न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौद अथवा कृत्रिम जलकुंडातच करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

“गणेशोत्सवाची परंपरा, श्रद्धा आणि उत्साह कायम ठेवतानाच पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक सजावट, निर्माल्याचे स्वतंत्र संकलन आणि कृत्रिम विसर्जन व्यवस्था यांचा वापर करून नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हातभार लावावा. नागरिकांच्या सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत शहराचा संकल्प प्रत्यक्षात येईल,” असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

निर्माल्य, कचरा स्वतंत्रपणे द्या
गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणारे निर्माल्य जलस्रोतांमध्ये विसर्जित न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य संकलन केंद्रात स्वतंत्रपणे जमा करावे. तसेच ओला, सुका आणि विशेष काळजीचा कचरा स्वतंत्रपणे संकलित करून पालिकेच्या कचरा व्यवस्थेकडे द्यावा.

नैसर्गिक सजावटीला द्या प्राधान्य
गणेशोत्सव मंडप आणि घरगुती सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून नैसर्गिक व पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे. विद्युत रोषणाईसाठी आवश्यकतेनुसार एलईडी दिव्यांचा वापर करून ऊर्जाबचतीला प्राधान्य द्यावे. ध्वनीविषयक नियमांचे पालन करून ध्वनी प्रदूषण होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.

“गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन या बाबींकडे नागरिकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. निर्माल्य व कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करून ते महापालिकेच्या संकलन व्यवस्थेकडे देणे, तसेच कृत्रिम विसर्जनस्थळांचा वापर करणे, या छोट्या छोट्या कृतींतून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साकारता येईल,” असे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"