ज्यादा परताव्याचे अमिष दाखवून 33 लाखांची फसवणूक!

पिंपरी : गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची 33 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जानेवारी 2024 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत धानोरे फाटा येथे घडली.

याप्रकरणी राहुल भोलेनाथ भोसले (वय 30, रा. चरवली खुर्द, ता. खेड )यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भागवत गंगाधर पराड (रा. आळंदी, खेड) आणि एका महिला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज 500 रुपये परतावा देण्याचे आमीष दाखवले. त्यानुसार फिर्यादीसह त्यांच्या ओळखीच्या योगेश वंजारी यांच्याकडून एक लाख 70 हजार रुपये, यशवंत गावडे यांच्याकडून दहा लाख, शुभम लोखंडे व मोनिका लोखंडे यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले. अशा प्रकारे एकूण 33 लाख 44 हजार 425 रुपये गुंतवून घेतल्यानंतर कोणताही परतावा न देता फसवणूक केली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली एक कोटी 37 लाखाची फसवणूक!
पिंपरी : क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून उद्योजकाची 1 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 9 मे 2024 ते आज पर्यंत घडली.
याप्रकरणी अमित रामभाऊ लांडगे (वय 42, लांडगे आळी, भोसरी) यांनी तक्रार दिली आहे. आशुतोष संजय उन्हाळे (रा. बालेवाडी, पुणे) समाधान शंकर कदम (बालेवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. क्रिप्टो करन्सीतील गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी कडून पैसे घेतले. त्यानंतर मूळ रक्कम अथवा परतावा न देता एकूण 1 कोटी 37 लाख 57 हजार 863 रुपयांची फसवणूक केली.

