Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

नगरसदस्यांच्या सूचनांचा योजनांमध्ये समावेश करून कालबद्ध कार्यवाही करा : महापौर रवि लांडगे

नगरसदस्यांच्या सूचनांचा योजनांमध्ये समावेश करून कालबद्ध कार्यवाही करा : महापौर रवि लांडगे

पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील विकासाला महामेट्रो फेज-२, ईआरटीएस बस सेवा, पार्किंग व सार्वजनिक शौचालय धोरणाच्या अंमलबजावणीचे निर्देश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि नागरी व्यवस्थापन अधिक सक्षम, आधुनिक व नागरिकाभिमुख करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. विकासाचे नियोजन करताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्यात यावी. नगरसदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून योजनांमध्ये आवश्यक सुधारणा व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश महापौर रवि लांडगे यांनी दिले.

viara vcc
viara vcc

ऑगस्ट मधील महापालिका सभेमध्ये सुचविल्याप्रमाणे आज महानगरपालिकेच्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प व धोरणांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महामेट्रो फेज-२ अंतर्गत निगडी ते चाकण मार्गिका, ईआरटीएस (ERTS) बस सेवा, वाहन पार्किंग धोरण आणि सार्वजनिक शौचालय धोरण या शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. विविध सादरणीकरणास महापालिकेच्या संबंधित विभागांचे प्रमुख पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

निगडी-चाकण महामेट्रो मार्गिकेला गती द्या
पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित महामेट्रो फेज-२ अंतर्गत निगडी ते चाकण मार्गिकेचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील निवासी व व्यावसायिक भागांना चाकण औद्योगिक पट्ट्याशी अधिक प्रभावीपणे जोडण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शहराच्या विविध भागांना मिळणारी कनेक्टिव्हिटी यासंदर्भात नगरसदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. “मेट्रो हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून शहराच्या पुढील अनेक दशकांच्या विकासाची दिशा ठरविणारा प्रकल्प आहे. त्यामुळे शहरातील नागरिक, औद्योगिक क्षेत्र आणि भविष्यातील विस्तार यांचा विचार करून प्रत्येक निर्णय घेतला पाहिजे,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले. नगरसदस्यांनी मांडलेल्या व्यवहार्य सूचनांचा पुढील नियोजनात समावेश करून आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

ईआरटीएस बस सेवेत नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला प्राधान्य
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ईआरटीएस (ERTS) बस सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाबाबतही सविस्तर सादरीकरण करण्यात आले. नागरिकांना जलद, सुलभ व कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे, प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करणे आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे या दृष्टीने या सेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. बससेवेचे प्रस्तावित मार्ग, प्रवाशांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, विविध भागांमधील कनेक्टिव्हिटी आणि अंमलबजावणीची प्रक्रिया यावर चर्चा करण्यात आली.

पार्किंग धोरण नागरिकांसाठी सुलभ असावे
शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पार्किंग समस्येवर दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध उपाययोजना करण्यासाठी प्रस्तावित वाहन पार्किंग धोरणाचेही सादरीकरण करण्यात आले. प्रमुख बाजारपेठा, व्यापारी क्षेत्रे, गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक परिसरातील पार्किंगचे नियोजन करताना उपलब्ध जागेचा अधिकाधिक परिणामकारक वापर करण्यासोबतच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. पार्किंग धोरण हे नागरिकांना त्रास देणारे नव्हे, तर त्यांची समस्या सोडविणारे असले पाहिजे, अशी भूमिका महापौर रवि लांडगे यांनी मांडली

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"