८.३३ टक्के दिवाळी बोनससह ३० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान!

स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या . अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी देण्यात येणारा ८.३३ टक्के प्रथा बोनस आणि २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान यामध्ये वाढ करून आता ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने उपसूचनेसह मंजुरी दिली आहे.

सन २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांसाठी बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा करारनामा करण्यास तसेच त्यासाठी होणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. उपसूचनेसह हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने दिवाळीचा प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान देण्यासाठी पाच वर्षांचा करारनामा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कामगार कल्याण मंडळाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर केला होता.
महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नियमानुसार बोनस व सानुग्रह अनुदानाचा लाभ दिला जातो. त्यानुसार ८.३३ टक्के बोनसासोबत पूर्वी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद होती. मात्र, स्थायी समितीने उपसूचना मंजूर करून ही रक्कम ३० हजार रुपये करण्यास मान्यता दिली आहे. अंतिम मंजुरीनंतर वाढीव सानुग्रह अनुदानाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

